शिरूर बसस्थानकाची सुरक्षा ’रामभरोसे’   

रांजणगाव गणपती, (वार्ताहर) : नव्याने बांधण्यात आलेली शिरूर एसटी बस स्थानक सुंदर होण्यापेक्षा  छोटेसे व अडगळीत पडल्यासारखे झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या व्यापारी गाळ्यांमध्ये हे बसस्थानक हरवले आहे. येथे शौचालयाचा व स्वच्छतेचा अभाव, रात्रीच्या वेळेस फिरणार्‍या व्यसनी लोकांचा वावर यामुळे बसस्थानकामध्ये प्रवासी पुरुष व महिलांच्या सुरक्षिततेचा बोजबारा उडाल्याचे दिसून येत आहे.
 
शिरूर शहरातील शिरूर एसटी बसस्थानक ऐतिहासिक बसस्थानक म्हणून याकडे पाहिले जात आहे. पहिली एसटी बस याच रस्त्यावरून व याच बस स्थानकामध्ये थांबून नगरकडे गेली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानकावर काही व्यावसायिक भीक मागणारे तसेच मोठ्या प्रमाणात बेघर लोकांचा अड्डा या ठिकाणी झाला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन लोकांचा वावर असतो, याचा येणार्‍या जाणार्‍या महिलांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागत आहे.
 
बसस्थानकाचे नवीन एसटी बस स्थानकात रूपांतर झाले आहे, परंतु बसस्थानक बांधताना मोठ्या प्रमाणात अन्य जागा व्यावसायिकाला दिली. यामुळे बसस्थानक म्हणून याकडे पाहिले जात नसून याचे व्यापारीकरण झाले आहे. बसस्थानकामध्ये कायमच अस्वच्छतेचा कहर आपल्याला दिसून येत आहे. बसस्थानकात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर केवळ संपूर्ण स्थानकात नऊ सीसीटीव्ही बसवण्यात आले तसेच दुसर्‍या बाजूकडून दोन सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. एवढे जरी असले तरी हे प्रवाशांची व बसेसची संख्या पाहता पुरेसे नाहीत. दररोज या ठिकाणी हजारो युवक-युवती, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात.      
 
बसस्थानकात महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे, मात्र तो देखील केवळ शोभेसाठीच आहे की काय असा सवाल उपस्थित होतो. तो बंद असल्याचे चित्र आहे. बसस्थानकात प्रवेश केला असता सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारापाशी असायला हवेत. मात्र त्या ठिकाणी सुरक्षारक्षक कधीच दिसून येत नाहीत. रात्रीच्या वेळी नशेखोर, मद्यपी यांचाही अनेकदा प्रवाशांना सामना करावा लागतो. रात्री नऊनंतर स्थानकात महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे असून याकडे परिवहन विभागाने तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष देणे  गरजेचे असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. 
 
बसस्थानकाच्या आजूबाजूला असणार्‍या मोकळ्या जागा, अंधाराच्या जागा या ठिकाणी  विद्युत दिव्यांची व्यवस्था करावी, अशी ही मागणी करण्यात येत आहे.
स्वारगेट प्रकरणानंतर राज्यात एसटी बस प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच शिरूर शहरात देखील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे चित्र दिसून आले आहे.

Related Articles