पैशाचे सोंग आणता येत नाही...   

अजित पवार यांची विधानसभेत कबुली

मुंबई, (प्रतिनिधी) : सगळी सोंगे आणता येतात; पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले. या खुलाशामुळे  योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नेमण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.
 
विधानसभेत २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी, चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले.
 
भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत भाग घेताना राज्य सरकारने लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी केरळसह अन्य राज्यांना लॉटरीपासून मिळणार्‍या महसुलाची माहिती दिली. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी आपल्या उत्तरात सर्व प्रकारच्या लॉटरीच्या माध्यमातून राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याची घोषणा केली. या समितीने अभ्यास करून महिनाभरात अहवाल द्यावा, असे पवार म्हणाले.

Related Articles