अंदाजपत्रकी अधिवेशनाचा समारोप २६ मार्चला   

मुंबई,  (प्रतिनिधी) : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीमध्ये निश्चित झाल्याप्रमाणे विधिमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचे कामकाज २६ मार्चपर्यंत चालणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे अधिवेशन आज (शुक्रवारी) गुंडाळण्यात येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
 
राज्य विधिमंडळाचे अंदाजपत्रकी  अधिवेशन सध्या मुंबईत सुरू असून २६ मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज जाहीर करण्यात आले होते. मात्र, काल अधिवेशनाच्या कामकाजात अंतिम आठवडा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने अधिवेशनाचे कामकाज आज गुंडाळण्यात येईल, अशी जोरदार चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती. त्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने खुलासा करण्याची मागणी केली.त्यावर सभागृहाचे कामकाज हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे  पूर्ण केले जाणार आहे. अखेरच्या आठवड्यात राज्यघटनेवर चर्चा होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related Articles