वाहनांच्या उच्च सुरक्षा पाटीला जूनपर्यंत मुदतवाढ   

पुणे : वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविण्याच्या कामाला येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरूवारी काढले आहे. या मुदतवाढीमुळे लाखो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रारंभी ३० मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र वाहनांना पाट्या बसविण्याचा वेग कमी असल्याने मार्च अखेरपर्यंतची मुदत एप्रिल अखेरपर्यंत वाढविण्यात आली होती. वाढविण्यात आलेली मुदतही वाहनांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्याचे मत पाट्या बसविणार्‍या केंद्र चालकांनी सांगितले होते. त्यानुसार आता ही मुदत जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मुदतवाढीचे परिपत्रक काढून राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहे. तसेच याबाबत स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनाची बैठक घेवून मुदतवाढीबाबत जनजागृती करण्याची सूचना देण्यात आली आहे. वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविण्यासाठीच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आडचणी येत होत्या. त्यामुळे पाट्या बसविण्याच्या कामाला गती येत नव्हती. त्यामुळे वाहनांवर कारवाई होण्याच्या भितीमुळे वाहन चालकांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 
 
पाठपुराव्याला यश
 
वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू आहे. पाटी बसविण्याची प्रक्रिया करणे, त्यानंतर पाटीची मागणी करणे आणि पाटी उपलब्ध झाल्यानंतर वाहनाला पाटी बसविणे  यात बराच वेळ जात आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहनांना पाटी बसविण्यासाठी अधिकचा कालावधी लागणार असल्याचे आम्ही परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्या मागणीस यश आले आहे. 
- राजू घाटोळे, अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य

Related Articles