पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान सेवेत वाढ कधी?   

पुणे : देशातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. या शहरातून विदेशात जाणार्‍या तसेच विदेशातून पुण्यात येणार्‍यांची संख्याही अधिक आहे. असे असतानाही सद्य:स्थितीत पुण्यातून केवळ दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या तीनच ठिकाणी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. इतर देशात जायचे झाल्यास पुण्यातील प्रवाशांना मुंबईसह अन्य विमानतळाचा पर्याय शोधावा लागतो. वाढलेल्या प्रवासामुळे प्रवाशांचा पैसे आणि वेळही वाया जातो. 
 
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या तीनच ठिकाणी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. मात्र पुण्यातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप देशात जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांना या देशांत जाण्यासाठी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरातील विमानतळांचा आधार घ्यावा लागतो. पुण्यातून जाण्यासाठी ‘कनेक्टिंग फ्लाइट’चा पर्याय शोधावा लागतो. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान सेवेत वाढ होणे गरजेचे आहे. तशी मागणी प्रवासी करत आहेत. 
 
लोहगाव येथील नवीन टर्मिनल सुरू झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढविण्यात येणार आहेत, यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे वारंवार विमान प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र टर्मिनल सुरू होऊन आठ ते नऊ महिने झाले, तरीही केवळ तीनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. त्याचा फटका पुणेकर प्रवाशांना बसत आहे. पुण्यातून दैनंदिन १५०० ते २००० प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरांत जातात. त्यामुळे आर्थिक भारासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पुण्यात जर्मनी, युरोप, फ्रान्स, इटली आणि स्वीडनसह अन्य देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे पुण्यात येणार्‍या आणि जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र टेक ऑफ करणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मर्यादित आहे. शिवाय जी विमान सेवा सुरू आहे, त्यातही काही वेळा उशीर वा विमानच रद्द होते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.
 
पुरंदर विमानतळ लवकर होणे गरजेचे 
 
नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी पुण्यातून जगभरात विमानाने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. पुणे विमानतळाच्या मर्यादांमुळे लांब पल्ल्याची थेट उड्डाणे पुण्यातून शक्य नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ, श्रम व पैसे खर्च करावे लागतात. मुंबई विमानतळ मार्गेदेखील मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवासी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून जात असतात. यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने बंद झालेली पुणे-मुंबई विमान सेवा सुरू केल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. लांब पल्ल्याची थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्यासाठी २०२९ पर्यंत तरी पुरंदर विमानतळ तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. 
 - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ 

Related Articles