आमिष दाखवून साडेनऊ कोटींची फसवणूक   

पुणे : शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यास म्युच्युअल फंडापेक्षा जास्त व्याजाने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकासह तिघांची नऊ कोटी ५० लाख ४४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. फसवणूक मोठी असल्यामुळे पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
नितीन वसंत डाके (वय ५७, शुक्रवार पेठ) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, राजेश रामगुलाब कुमार उर्फ राज कोटारीया, वंदना भीमराव शिरसाट (डीएसके विश्व, धायरी) या दोघांवर महाराष्ट्रातील ठेवीदाराचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. डाके हे एका कंपनीत भागीदार आणि संचालक होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. डाके यांच्या शेजारी राहणारे एकजण शेअर मार्केट संदर्भात प्रशिक्षण वर्ग घेत होते. त्यांच्यामार्फत आरोपी कोटारीया याच्यासोबत डाके यांचा २०२१ मध्ये परिचय झाला होता. डाके यांनी कोटारीया याच्याकडे देखील शेअर मार्केटसंदर्भातील प्रशिक्षण घेतले. कोटारीया याने डाके यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास म्युच्युअल फंडपेक्षा दरमहा आठ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून डाके यांनी वंदना शिरसाट हिच्या खात्यावर वेळोवेळी तब्बल २१ कोटी ५० लाख रुपये गुंतविले. कोटारीया याने त्यातील १३ कोटी ८ लाख ६० हजार रुपये डोके यांना परत केले.
 
डाके ऑक्टोबर २०२३ मध्ये डीएसके विश्वमधील कोटारीयाच्या कार्यालयामध्ये गेले. त्यावेळी त्याने ‘गुंतवणूक जाहिरातीच्या संदर्भात कोणीतरी माझ्या विरुद्ध तक्रार केली असून, सेबीकडून नोटीस आल्याने परतावा देण्याचे मी बंद केले आहे. तुमचे राहिलेले सर्व पैसे एप्रिल २०२४ पर्यंत एकरकमी देईल’, असे डाके यांना सांगितले. डाके कोटारीयाच्या संपर्कात होते. मात्र, काही दिवसानंतर त्याचा संपर्क बंद झाला. त्यामुळे डाके यांनी परत त्याचे कार्यालय गाठले. त्यावेळी कार्यालय बंद करून कोटारीया फरार झाल्याचे त्यांना समजले. अशाच प्रकारे कोटारीया आणि त्याच्या साथीदार महिलेने मिळून इतर दोन गुंतवणूकदारांची एक कोटी नऊ लाख चार हजार रुपयांची फसवणूक केली. तर, डाके यांचे आठ कोटी ४१ लाख ४० हजार रुपये असे एकूण नऊ कोटी ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles