गोळीबार करणार्‍या पाच जणांना अटक   

पुणे : वैयक्तिक वादाच्या कारणावरून दहशत निर्माण कऱण्यासाठी हवेत गोळीबार करणार्‍या पाच जणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. गणेश संजय चौधरी (वय २९), ओंकार अंकुश लांडगे (वय २५), दत्तात्रय भरत गाडे (वय २५), प्रताप अंकुश अडसूळ (वय २२), महेंद्र दत्तात्रय गाडे (वय २३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अजित महादेव जाधव यांनी तक्रार दिली होती.
 
तक्रारदार अजित जाधव आणि आरोपी गणेश चौधरी यांच्यामध्ये  वैयक्तिक करणावरून वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे मागील आठवड्यात भांडणे झाली होती. त्यावेळी, गणेश चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार गणेश संजय चौधरी व त्याचे इतर साथीदार मित्र याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने पोलीस पथकाने  उरुळी कांचन, यवत, दौंड परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटार, तीन दुचाकी, हवेत गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा ५ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरीक्षक रविंद्र गोडसे, अंमलदार अजित फरांदे, कैलास साळुंखे, स्वप्नील जाधव, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके, मल्हारी सपुरे, सुधीर शिवले, गणेश दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles