जुन्या वादातून चालकाने पेटवली बस   

दिवाळीचा कापलेला पगार आणि कर्मचार्‍यांसोबतच्या वादातून कृत्य

पिंपरी : हिंजवडीतील बस दुर्घटनेस धक्कादायक वळण लागले आहे. दिवाळीचा कापलेला पगार आणि कर्मचार्‍यांसोबतच्या वादातून चालकाने केमिकल पेटवून बसला आग लावल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चालकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.जनार्दन हंबर्डीकर (वय ५६, रा. कोथरूड) असे या चालकाचे नाव आहे. या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
हिंजवडीतील व्योम ग्राफिक कंपनीच्या बसवर तो चालक म्हणून काम करतो. हंबर्डीकर याचे काही कर्मचार्‍यांशी वाद होते. तसेच दिवाळीत कंपनीने त्याचा पगारही कापला होता. त्याला अतिरिक्त कामे व अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्याचा सहकार्‍यावर रोष होता. या रागातून त्याने घातपात घडविला. त्याने घटनेच्या एक दिवस आधी मंगळवारी कंपनीतूनच एक लीटर बेंजिम सोल्युशन नावाचे रसायन बाटलीत भरून सीटखाली आणून ठेवले. टोनर पुसण्यासाठी लागणार्‍या चिंध्याही त्याने ठेवल्या. बुधवारी सकाळी त्याने वारजे माळवाडी येथून आगपेटी विकत घेतली. हिंजवडी टप्पा एक परिसरात येताच हंबर्डीकरने बस थांबवत काडी पेटवून कापडाच्या चिंध्यांना आग लावली. रसायनामुळे काही वेळातच आगीचा भडका उडाला. त्यानंतर, त्याने तातडीने बसमधून बाहेर उडी मारली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, चालकासह सहा कामगार जखमी झाले. त्यापैकी, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
असा आला प्रकार उघडकीस
 
बसची तपासणी केल्यानंतर काडीपेटीसह काही वस्तू आढळल्या.  प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या अधिकार्‍यांनी बसची पाहणी केली असता शॉर्टसर्कीटची पुष्टी झाली नाही. एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये हंबर्डीकर  बसच्या सीट खाली काहीतरी पेटवत असल्याचे पुसटसे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. शिवाय, जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यात तफावत दिसत होती. किरकोळ जखमी होऊनही तो वारंवार शुद्ध हरपल्याचे नाटक करत होता, हे पोलिसांच्या लक्षात आले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 
 
दिवाळीचा कापलेला पगार, मजुरीचे काम आणि कर्मचार्‍यांसोबतच्या वादातून चालकाने रसायन पेटवून आग लावल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हंबर्डीकर वैद्यकीय कोठडीत आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त

Related Articles