तुकोबारायांचे मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर   

मंदिराच्या कामास वेग

पिंपरी  :  संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पार पडला. भाविकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या सोहळ्यामुळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणार्‍या भव्यदिव्य मंदिर निर्मितीस गती मिळाली आहे. भाविकांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे संत तुकोबारायांचे नागर शैलीतील महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 
 
संत तुकाराम महाराजांची चिंतन भूमी म्हणून श्री क्षेत्र भंडारा डोंगराची ओळख आहे. या ठिकाणी तुकोबांना गाथा स्फुरली. इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगली आणि लोकशिक्षणाच्या सागरात अखंड आणि अव्याहतपणे प्रवाहित राहिली. तुका आकाशाएवढा संकल्पना साकारण्यासाठी त्यांच्या कार्याला साजेसे भव्य आणि दिव्य मंदिर डोंगरावर साकार व्हावे, अशी सकल वारकरी संप्रदायाचे आणि भाविकांचे स्वप्न होते. त्यासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टने पुढाकार घेतला व २०१६ मध्ये मंदिराची पायाभरणी करण्यात आली.स्थापत्त्यकलेची अलौकिक उदाहरणे असलेल्या गांधीनगरचे अक्षरधाम, अयोध्येतील श्रीराम मंदिर तसेच अमेरिकेतील हिंदू जैन मंदिर धर्तीवर मंदिराची उभारणी होण्याचे ध्येय ठेवण्यात आले. 
 
अभंगाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणार्‍या तुकोबांविषयी काहीशी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने डोंगरावर मंदिर निर्मितीचा भव्य आराखडा तयार करण्यात आला. मंदिर उभारण्यासाठी वास्तुविशारद म्हणून पद्मश्री चंद्रकांत सोनपुरा आणि परेशभाई सोनपुरा यांची नियुक्ती करण्यात आली. 
 मंदिर उभारणीचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून आर्थिक हातभार लागला आहे. मंदिराचे उर्वरित बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस समितीच्या सदस्यांचा आहे.
 
संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन वर्षाच्या माध्यमातून, मंदिर उभारणीला भरघोस मदत प्राप्त व्हावी, या उद्देशाने  ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली) यांनी पारायण सोहळा आयोजित करण्याची संकल्पना मांडली. त्याला शांतीब्रह्म मारोती महाराज कुर्‍हेकर यांनी आशीर्वाद दिले.  अनेक नामांकित कीर्तनकारांच्या उपस्थितीत नऊ ते १७ मार्चच्या कालावधीत भव्य पारायण सोहळा यशस्वी झाला.या कालावधीत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टद्वारे महाराजांच्या ७ किलोच्या चांदीच्या पादुकांची नव्याने निर्मिती व संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते यथासांग प्राणप्रतिष्ठा व पूजा झाली.  
 
छोटे माउली, निःस्वार्थी हेतूने आले व सेवाकार्य बजावून परत निघून गेले. जाता जाता, पुढे ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या समाधी सोहळ्या निमित्त होणार्‍या सप्ताहासाठी ५ लाख, देहू संस्थानासाठी १ लाख, घोरावडेश्वर संस्थानासाठी १ लाख, भामचंद्र संस्थानासाठी १ लाख, परमपूज्य कुर्हेकर बाबांच्या आरोग्य खर्चासाठी १ लाख असा निधी सुपूर्त करून गेले. व अन्नदानातील उर्वरित किराणा, तसेच इतर साहित्य व निधी अशी २ कोटी पर्यंतची मदत त्यांनी भंडारा डोंगर समितीकडे सुपूर्द केली.या उपक्रमाचे संपूर्ण राज्यातच नव्हे तर जगभरात कौतुक झाले.    
 
धार्मिक पर्यटनाला चालना 
 
श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर निर्माण होत असलेल्या तुकोबांच्या मंदिराविषयी वारकरी संप्रदायाला उत्सुकता आहे. या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा मिळून सशक्त भारत संकल्पनेला बळ मिळणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. देव, देश आणि धर्मासाठीची ही सेवा लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकार्पित व्हावी, हीच सदिच्छा आहे.
- ज्ञानेश्वर महाराज कदम, मुख्य संयोजक गाथा पारायण सोहळा
 
पूर्ततेचा कळस व्हावा!
 
अभंगाच्या अविट गोडीतून संपूर्ण जगाला मानवतेची अमूल्य शिकवण देणार्‍या संत तुकाराम महाराजांना ज्या डोंगरावर गाथा स्फुरली. त्या ठिकाणी त्यांचे भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न उराशी होते. भाविकांनी आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली. त्यामुळे मंदिराची पायाभरणी होऊ शकली. महोत्सवाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज (छोटे माउली) यांचे मिळालेले अमूल्य सहकार्य व आशीर्वाद ह्यासाठी भंडारा डोंगर समिती कायमच ऋणी राहील.  आता पूर्ततेचा कळस व्हावा, हीच श्री भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. 
- बाळासाहेब काशिद (अध्यक्ष) श्री क्षेत्र भंडारा डोंगर दशमी सोहळा समिती

Related Articles