महान स्वातंत्र्य सेनानी मियॉ अकबर शाह   

गाऊ त्यांना आरती , शिरीष चिटणीस 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १७ जानेवारी १९४१ रोजी पहाटे दीड वाजता कोलकाता येथून शिशीरकुमार बोस यांनी ३२० कि.मी. प्रवास करून गोमोह रेल्वेस्थानकावर सोडले. ज्या स्थानकावर नेताजींना सोडण्यात आले होते, त्याचे नाव आता ’नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन’ असे आहे. बिहारमधल्या धनबादपासून (आता ते झारखंडमध्ये आहे) चाळीस किलोमीटर अंतरावर हे गोमोह रेल्वे स्थानक आहे. १८ जानेवारी १९४१ रोजी रात्री नेताजींनी तिथून दिल्ली-कल्का मेल आणि त्यानंतर ’फ्रंटियर मेल’ने ते पेशावरला पोहोचले. पेशावरहून काबूलला जाण्याची व्यवस्था करण्यासाठी मियां अकबर शाह या वायव्य आघाडी प्रांतातल्या पठाणाला डिसेंबर १९४० च्या दुसर्‍या आठवड्यात कोलकाता येथे आपल्या घरी नेताजींनी बोलावले होते.
 
१९ जानेवारी १९४१ रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे आलेल्या फ्रंटियर मेलच्या बाहेर जाण्याच्या फाटकापाशी त्याने नेताजींची वाट बघितली. मियां अकबर शाह याला ’लांब काळा कोट घातलेले विशेष उठून दिसणारे मुसलमान सद्गृहस्थ दिसले’. मंहम्मद झियाउद्दीन नाव धारण केलेले आणि त्या वेशातले ते सुभाषचंद्र बोसच होते. तिथे वाट पहात थांबलेल्या तिकीट कलेक्टरला नेताजींनी आपले तिकीटे दिले आणि ते फाटकातून बाहेर पडले. अकबर शाह त्यांच्या जवळ सरकले आणि हलक्या आवाजात बोलत त्यांना टांग्यापर्यंत जायचा रस्ता सांगितला. डीन्स हॉटेलात जिथे किपलींग, चर्चिल, जीना, अफगाणिस्तानचा राजा नादिरशाह आणि इतिहासकार अर्नाल्ड टोइब्बी पाहुणे म्हणून राहून गेले आहेत तिथे नेताजींना मुक्कामाला अकबर शाह यांना न्यायचे होते; पण ज्या टांग्यात नेताजी बसले होते त्याने नापसंती दर्शवित हे हॉटेल नास्तिक लोकांसाठी आहे. हे गृहस्थ तर आस्तिक दिसतात असे म्हटल्याने, नेताजींना ताजमहाल हॉटेलमध्ये ते घेऊन गेले.
 
पठाणांच्या चालीरिती शिकल्या
 
दुसर्‍या दिवशी तांबडे फुटण्यापूर्वीच अकबर शाह यांचे विश्वासू सहकारी अबद खान जे पेशावर जिल्ह्यातील ’फॉरवर्ड ब्लॉक’चे वरिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या साध्या घरी नियोजन केल्याप्रमाणे घेऊन गेले. पेशावर ते काबुलपर्यंत नेताजींना नेण्यासाठी मियां अकबर शहा यांनी अबद खान, महंमद शहा आणि भगत राम तलवार यांची निवड केलेली होती. अबद खान यांच्या घरी नेताजी सुभाषचंद्र बोस २० ते २५ जानेवारी १९४१ असे सहा दिवस राहिले. या काळात पठाणांच्या चालीरीती, सवयी, रिवाज याविषयी नेताजींना माहिती देण्यात आली. पाणी काचेच्या भांड्यातून न पिता कंडोळीमधून पिण्याची सवय या सहा दिवसात नेताजींनी करून घेतली. 
 
अबद खान यांनी नेताजींना चालायचे कसे, लोकांनी केलेल्या अभिवादनाला प्रतिसाद कसा द्यायचा, मूक-बधीर असल्याचे भासवायचे असल्याने, इतरांबरोबर मूकबधीर असूनही इतरांबरोबर अन्न वाटून घेत एकाच ताटातून कसे जेवायचे याचे प्रशिक्षण दिले. आदिवासी भागात असताना मशिदीत जाऊन प्रार्थना कशी म्हणायची याच्याही सूचना नेताजींना दिल्या गेल्या. रविवार दिनांक २६ जानेवारी १९४१ रोजी सकाळी पठाणी वेशात, खांद्यावर घडी केलेले एक कांबळ टाकून सुभाषचंद्र बोस यांनी अबद खानचे पेशावरमधले घर सोडले. अबद खान यांनी त्यांच्यासाठी एका कारची व्यवस्था केली होती. नेताजींच्या सोबतीला महमंद शाह, भगत राम तलवार, आणि अबद खान यांनी दिलेला वाटाड्या होता. मियां अकबर शाह आपल्या बद्राशी गावी परतले. पेशावर शहरापासून सुमारे पंचवीस मैलांवर हे गाव आहे. पेशावर विभाग खैबर पख्तुनख्वा प्रांतात येतो. या प्रांतातले बद्राशी हे पन्नास हजार वस्तीचे नौशेरा जिल्ह्यातील गाव आहे. आधीपासून रचलेल्या योजनेनुसार नेताजी कोलकाता येथून एल्जिन रस्त्यावरच्या घरातून नाहीसे झाल्याची बातमी कोलकात्यात सगळीकडे पसरविण्यात आली. २७ जानेवारी १९४१ रोजी पोलीस ३८/२ एल्जिन रस्त्यावरच्या घरी येऊन त्यांनी माहिती काढण्यास सुरुवात केली. तोपर्यंत नेताजी आदिवासी प्रदेशांमधून अफगाणिस्तानकडे आणि पुढे काबूलच्या दिशेने प्रवास करू लागले होते. ब्रिटीश पोलिसांच्या कचाट्यातून ते केव्हाच बाहेर पडले होते. ३१ जानेवारी १९४१ रोजी ते काबुलमध्ये पोहोचले. साधारण १७ मार्च १९४१ सुमारास इटालियन दुतावासाच्या मदतीने त्यांनी अखेर काबूल सोडले आणि उत्तरेला सोव्हिएत युनियनच्या सीमेकडे कूच केले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोव्हिएत युनियनमार्गे नेताजी समरकंदपर्यंत रेल्वेने प्रवास करून पुढे मॉस्कोवरून विमानाने ‘ओरलँडो मझोटा’ या इटालियन नावाने बर्लिनला पोहोचले.
 
नेताजींचे मित्र
 
पेशावर ते काबूलपर्यंतचे नियोजन करणारे नेताजींचे मित्र म्हणजेच मियां अकबर शाह. अकबर शाह यांचा जन्म १८९८ मध्ये पेशावर जिल्ह्यातील नौसेरा तहसीलमध्ये बद्राशी नावाच्या गावात झाला. तरुणपणापासूनच त्यांच्या काही राजकीय आकांक्षा होत्या. १९२० मध्ये त्यांनी अफगाणिस्तानमार्गे सोव्हिएत युनियनपर्यंत प्रवास केला होता. त्यामुळे ते ब्रिटीश अधिकार्‍यांच्या नजरेस आले व परत आल्यावर त्यांना अटक करून काही काळ तुरूंगात ठेवण्यात आले. १९३०च्या सुमारास ते वकील झाले. १९३३ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होत पेशावर भागातले प्रसिद्ध काँग्रेस कार्यकर्ते झाले. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी झालेल्या मतभेदानंतर एप्रिल १९३९ च्या अखेरीस काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकचे काम चालू केल्यानंतर अकबर शाह हे त्यांचे निकटवर्तीय झाले. भारतीय उपखंडात पसरलेल्या, नेताजी बोस यांना पाठिंबा देणार्‍या प्रगत, डाव्या विचारसरणीच्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी ते एक होते. अकबर शाह फॉरवर्ड ब्लॉकच्या आघाडी प्रांताचे मुख्य व्यवस्थापक झाले. सन १९३९ च्या मध्यापासून ते १९४० च्या मध्यापर्यंत अकबर शहा यांना पुन्हा एकदा कोलकात्यात अटक करून तुरूंगात टाकण्यात आले.
 
मध्य आणि दक्षिण भारतातल्या नेताजींच्या दौर्‍याच्या वेळी अकबर शाह आपल्या नेत्याची सोबत करीत. पेशावरमध्ये नेताजींसाठी अकबर शाह यांनी दोन मोठे मेळावे आयोजित केले होते. यामध्ये नेताजींनी भाषण केले. एक मेळावा पेशावर येथे होता, तर दुसरा छावणी भागात. ब्रिटीशांनी छावणी भागातील मेळाव्यावर बंदी घातली; पण शेवटच्या क्षणी त्रास होईल म्हणून उठवली. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ’खुदाई खिदमतगार’ संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने पेशावरमधल्या मेळाव्यांना उपस्थित होते. नेताजींवर याची चांगली छाप पडली. पेशावरमधल्या मेळाव्यांच्या यशाचे श्रेय आघाडी प्रांतातले आपले प्रमुख प्रतिनिधी मियां अकबर शाह यांच्या संघटन क्षमतेचे आहे, असे नेताजींनी लिहून ठेवले आहे.  तुरूंगात प्रचंड प्रमाणात त्यांचा छळ करण्यात आला; पण त्यांनी कोणतीही सुभाषचंद्र बोस यांची माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. 
 
नेताजींचे उपोषण
 
डिसेंबर १९४० च्या पहिल्या आठवड्यात ब्रिटिश सरकारने काहीशा नाईलाजाने कलकत्त्याच्या प्रेसिडन्सी तुरुंगातून पाच महिन्यांच्या कैदेनंतर उपोषणाला नेताजींनी सुरुवात केल्यामुळे सुटका केली; पण बोस यांच्या घरी त्यांना स्थानबद्ध करून पहारा बसविला. डिसेंबर १९४० च्या दुसर्‍या आठवड्यात नेताजींनी तार करून मियां अकबर शाह यांना कलकत्त्याच्या घरी बोलावून घेतले. नेताजींनी अकबर शाह यांना सांगितले की, तुरुंगातून बाहेर पडण्याचा माझ्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे उपोषण. मला भारत सोडून ब्रिटीश साम्राज्यवादाला विरोध करणार्‍या सोव्हिएत युनियनसारख्या देशाच्या नेत्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी मदत मागायची आहे. अकबर शाहने आपल्याला भारताची वायव्य आघाडी ओलांडायला आणि पुढे अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथल्या आदिवासी भागातून प्रवास करायला मदत करावी, अशी इच्छा आहे. मला माझा पुतण्या शिशीरकुमार बोस गोमाह रेल्वेस्थानकावर सोडेल मी तिथून रेल्वेने पेशावर येथे येईन. पेशावर ते काबूलपर्यंत सोडण्याची माझी व्यवस्था करा. मियां अकबर शाह यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नेताजींना काबूलपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली, ज्या दिवशी मियां अकबर शाह यांना अटक झाली, त्याच दिवशी महंमद शाह आणि अबद खान यांनाही अटक झाली. जुलै १९४३ मध्ये अकबर शाह बरोबरच महंमद शाह यांना देखील पेशावर मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले; मात्र नेताजींच्या सुटकेत हात असलेल्या आघाडी प्रांतातल्या लोकांपैकी सर्वात जास्त त्रास अबद खान यांना झाला. लाहोर किल्ल्यावरच्या कुप्रसिद्ध तुरूंगात अबद खान यांचा अतोनात छळ करण्यात आला.
 
मिया अकबर शाह यांचे घर, जमीन जुमला पाकिस्तान देशात गेल्याने ते तिकडचेच रहिवासी झाले. भारताच्या फाळणीनंतर ते बद्राशीलाच राहिले. शिशिरकुमार बोस यांच्या नेताजी रिसर्च ब्युरोला अकबर शाह जिवंत असून, अजून ते बद्राशीलाच राहत असल्याची बातमी १९७० च्या दशकात मिळाली. नेताजींच्या संघर्षात साथ देणार्‍या आणि ऑगस्ट १९४७ पासून पाकिस्तानात राहणा-या काही साथीदारांना नेताजी भवन इथं आणण्याचे बरेच प्रयत्न शिशिरकुमार बोस यांनी सन १९७० च्या अखेरपर्यंत केले. त्यामध्ये ’आयएनए’च्या पहिल्या तुकडीचे कमांडर झमन कियानी होते. कर्नल हबीब-उर-रहमान होते. ते ’आयएनए’चे उपसेनाध्यक्ष होते आणि त्यांच्या अधिकारी प्रशिक्षण शाळेचे प्रमुख होते. नेताजींच्या अखेरच्या प्रवासात ते त्यांच्या सोबत होते. जानेवारी १९७७ मध्ये शिशिर यांचे प्रयत्न अगदी सफल होण्याचे बेतात आले होते. अकबर शाह आणि शौकत मलिक यांनी भारतीय व्हिसा साठी अर्ज केले आणि त्यांना व्हिसाही मिळाला. 
 
योगायोगाने पुनर्भेट
 
अचानक १९८३ मध्ये शिशिरकुमार बोस आणि त्यांची पत्नी कृष्णा बोस त्यांचा थोरला मुलगा लंडनच्या केंब्रीज विद्यापीठातून पीएचडी पदवी घेणार होता त्यासाठी पदवीदान सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी अकबर शाह त्यांच्या मुलाकडे वैद्यकीय उपचारासाठी इंग्लंडमध्ये होते. त्यांचा मुलगा जफर शाह इंग्लंडमध्ये वॉलसॉल इथे राहतो. डिसेंबर १९४० मध्ये शिशिरकुमार बोस आणि अकबर शाह नेताजींच्या सुटकेसाठी कलकत्ता येथे भेटले होते. त्यांनी सुटकेच्या नियोजनाची चर्चाही केली होती. शिशिरकुमार बोस पत्नीसह जेव्हा त्यांच्या घरी १९८३ साली गेले, तेव्हा अकबर शहा आणि जफर शाह त्यांची आतुरतेने वाट बघत होते. ४२ वर्षांनी शिशिरकुमार बोस आणि अकबर शाह भेटले. अकबर शाह मोठ्यांदा हसत शिशिरला म्हणाले.... ’आपण आत्ता योगायोगानं भेटलो यावर ब्रिटीशांचा विश्वासच बसणार नाही. तू तुझ्या मुलांच्या पदवीदान सोहळ्यासाठी इंग्लंडला आला आहेस आणि मी त्याच वेळेस माझ्या मुलाकडे वैद्यकीय उपचारांसाठी आलो आहे हे त्यांना पटणारच नाही. त्यांना वाटेल आपण काहीतरी कारस्थान रचतोय. मागे रचले होत तसंच !’.
 
१९८३ मध्ये इंग्लंडमध्ये मियां अकबर शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी नेताजींना काबूलपर्यंत कसे पोहचविले याचा तोंडी सांगितलेला वृत्तांत लेखी स्वरूपात ’नेताजी रिसर्च ब्यूरो’ कडे दिला. त्याचा समावेश नेताजी यांच्या ’द ग्रेट एस्केप’च्या तिसर्‍या आवृत्तीपासून ’नेताजीच एस्केप : अन अनटोलड चॅप्टर’ नावानं परिशिष्ट म्हणून जोडण्यात आला. फाळणीमुळे या स्वातंत्र्यलढ्यातील ज्या स्वातंत्र्यसेनानींचे आयुष्य बेचव झाले त्यातील एक महान स्वातंत्र्यसेनानी म्हणजे मियां अकबर शाह.

Related Articles