बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक जास्त फायद्याची   

वृत्तवेध 

जमीन किंवा रिअल इस्टेट ही अशी गुंतवणूक आहे, जी अनेक पिढ्यांसाठी परतावा देते. तुम्हालाही दीर्घ मुदतीच्या परताव्यासाठी मालमत्तेत गुंतवणूक करायला आवडत असेल तर भारतात गुंतवणुकीसाठी फक्त दिल्ली-मुंबईसारखी शहरेच नाहीत, तर इतर अनेक शहरे रिअल इस्टेटमध्ये चांगला परतावा देत आहेत, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. देशाच्या या भागात आणि नवीन उदयोन्मुख शहरांमध्ये रिअल इस्टेटची मागणी आणि त्याच्या किमतीत वाढ होत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राचे भवितव्य आता दिल्ली-मुंबई-बंगळुरूसारख्या मोठ्या मेट्रो शहरांनी लिहिलेले नाही, तर देशातील टियर-२ आणि टियर-३ शहरांनी लिहिले आहे. घर खरेदी करणार्‍यांकडून येथे मागणी वाढत आहे आणि विकासकदेखील मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.
 
रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची संस्था ‘क्रेडाई’ आणि ‘लियाझ फोराज’ यांच्या संयुक्त अभ्यासात अनेक अनोख्या गोष्टी समोर आल्या आहेत. डेटा विश्लेषणाच्या आधारे, आढळून आले की विकासकांनी २०२४ मध्ये एकूण ३,२९४ एकर जमिनीची खरेदी आणि विक्री केली आहे. यातील टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये सुमारे ४४ टक्के जमीन खरेदी करण्यात आली. पायाभूत सुविधांमध्ये सरकारच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे छोट्या शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. त्याच वेळी ही शहरे खर्चाच्या बाबतीत अजूनही परवडणारी आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये निवासी आणि व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने लोकांची गुंतवणूक वाढत आहे. खरेदी केल्या गेलेल्या जमिनीपैकी जवळपास निम्मी जमीन विकासकांनी छोट्या शहरांमध्ये खरेदी केली आहे.
 
या ६० छोट्या शहरांमध्ये घरांची विक्री २० टक्क्यांनी वाढली आहे. एकूण सहा लाख ८१ हजार १३८ निवासी युनिट्सची विक्री झाली आहे. मूल्याच्या दृष्टीने पाहिल्यास ही वाढ ४३ टक्क्यांनी वाढून ७.५ लाख कोटी रुपये झाली आहे. आलिशान घरांच्या विक्रीमुळे या वाढीला मोठी मदत झाली आहे. लक्झरी युनिट्सची विक्री एकूण मूल्याच्या ७१ टक्के होती. भारताच्या रिअल इस्टेट बाजाराचा आकार २२.५ लाख कोटी रुपये आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याचे योगदान ७.२ टक्के आहे. रिअल इस्टेटसाठी उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गाझियाबाद, नोएडा, कल्याण, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमधील सॅटेलाइट शहरांचा समावेश होतो. लखनऊ, जयपूर आणि भुवनेश्वर या राज्यांच्या राजधानीदेखील या श्रेणीत येतात.

Related Articles