राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता सीबीएसई अभ्यासक्रम   

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची लेखी उत्तरात माहिती

मुंबई : खासगी शाळांप्रमाणे राज्य शिक्षण मंडळांच्या शाळातही आता सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. सन २०२५-२६ च्या शालेय वर्षांपासून त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या लेखी उत्तरात दिली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी त्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
 
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू होण्यासंदर्भात नेमलेल्या समितीने सीबीएसई अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लागू करण्यास मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच  सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
 
राज्यात सीबीएसई शाळांमध्ये शिक्षणाचा बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क काही शाळा घेत असतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी सीबीएसई प्रणालीचे शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण सुरु करण्यासंदर्भात सुकाणू समिती नेमली होती. या समितीने राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला मान्यता दिली आहे.
 
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिल्यानुसार सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीसह अन्य माध्यमांसाठी ती उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.  एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.
 
राज्यातील किती शाळा सीबीएसई अभ्यासक्रम यावर्षी सुरु करणार याबाबत अजून स्पष्टता नाही. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता दोन्ही बोर्डाचे पर्याय मिळणार आहे. यामुळे कमी शुल्कात विद्यार्थ्यांनी सीबीएसईचे शिक्षण घेता येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles