सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी   

गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातली घोषणा केली. .राम सुतार यांचं वय १०० वर्षं आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली.२५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. 
 
राम सुतार कोण आहेत?
 
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी  राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम केले. हे सर्व काम ते सरकारी नोकरीत राहून करत होते. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.
 
राम सुतार यांची प्रमुख कामे
 
स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मी, सरदार वल्लभभाई पटेल, गुजरात)
भगवान श्रीरामाची २५१ मीटर उंच मूर्ती (अयोध्या)
१५३ फूट उंच भगवान शिव मूर्ती (बेंगळुरू)
छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा (मोशी, पुणे)
 
काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे.

Related Articles