१७ तासांचा थरार ... अन जगभरात जल्लोष   

वाशिंग्टन/नवी दिल्ली : मागील नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले अंतराळवीर काल पृथ्वीवर पोहोचले. मंगळवारी सकाळी सुरू झालेला अंतराळवीरांचा परतीचा प्रवास बुधवारी पहाटे संपला. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी १७ तासांचा वेळ लागला. चार अंतराळवीरांना घेऊन आलेले कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनार्‍याजवळ समुद्रावर अलगदपणे उतरले.  त्यानंतर, जगभर एकच जल्लोष करण्यात आला. 
 
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ड्रॅगन कॅप्सूलचा वेग ताशी १७,००० मैल होता. तो काही मिनिटांतच कमी झाला. पहाटे ३:२४च्या सुमारास पहिल्यांदा ड्रॅगन कॅप्सूलचे दोन पॅराशूट उघडले गेले. यामुळे त्याचा वेग आणखी कमी झाला. या दरम्यान, एक धक्का बसल्यानंतर कॅप्सूलचा वेग आणखी मंदावला आणि ते अलगदपणे समुद्रात उतरले. त्यानंतर रिकव्हरी टीमने तेथे पोहोचून पहिल्यांदा सुरक्षेची तपासणी केली आणि पॅराशूट हटवले. दरम्यान, समुद्राच्या पाण्यावर कॅप्सूल उतरल्यानंतर त्याच्याभोवती डॉल्फिन पोहोताना दिसले. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरने या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला. पृथ्वीच्या कक्षेत येताच वातावरणाशी घर्षण होताच कॅप्सुलचे तपमान १९०० अंश एवढे वाढले होते. तसेच, कॅप्सुलचा नासाच्या  नियंत्रण कक्षाशी सात मिनिटे संपर्क तुटला होता. त्यामुळे सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन पूर्ण केले : व्हाईट हाऊस
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळात अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्याचे आश्वासन दिले होते आणि ते त्यांनी पूर्ण केले आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये व्हाईट हाऊसने स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनार्‍यावर खाली उतरतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ९ महिने अंतराळात अडकल्यानंतर नासाचे अंतराळवीर अखेर पृथ्वीवर उतरले, असे व्हाईट हाऊसने पुढे म्हटले आहे.
 
तुमचे स्वागत आहे!
 
अवकाश स्थानकावर विस्तारित मोहिमेवर यशस्वीपणे कार्य करून सुरक्षित परतलात, हे अतिशय गौरवशाली आहे. नासा, स्पेसएक्स आणि अमेरिकेच्या अवकाश संशोधनातील योगदानाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तुमची जिद्द आणि समर्पण जगभरातील अवकाशप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.
 
परराष्ट्र सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या सहकार्‍यांच्या वतीने तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो व तुम्हाला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित राष्ट्र होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रवासात अवकाश संशोधन क्षेत्रात तुमच्या कौशल्याचा लाभ घेण्याची आम्हाला इच्छा आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
क्रू ९ तुमचे स्वागत आहे. पृथ्वीने तुमची खूप आठवण काढली. त्यांच्यासाठी (सुनीता आणि बुच) ही धैर्याची, धाडसाची आणि अमर्याद मानवी आत्म्याची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि क्रू ९ अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अवकाशासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Related Articles