विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी   

घरबसल्या करता येणार नोंदणी, चंदनउटी पूजेचा देखील समावेश

सोलापूर, (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. १ एप्रिल ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरुवात २५ मार्च रोजी सकाळी ११.०० पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
   
याबाबत मंदिर समितीच्या ०३ मार्च रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी हीींिीं://ुुुर्.ींळीींंहरर्श्रीीज्ञाळपळारपवळी.ेीस या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ व दुसर्‍या टप्प्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
   
आता, तिसर्‍या टप्प्यात ०१ एप्रिल ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६ -२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.
   
ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून पासून सुरुवात होत आहे, या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

Related Articles