लालू प्रसाद यादव ईडीसमोर हजर   

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव बुधवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. त्यांच्यासमवेत मोठी कन्या आणि पाटलीपुत्रच्या खासदार मिसा भारती उपस्थित होत्या. यावेळी आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणात ईडीने लालू प्रसाद यांना समन्स बजावत काल चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी ईडीने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे आमदार पुत्र तेज प्रताप यादव यांची जवळपास चार तास चौकशी केली होती. या प्रकरणात लालू यांचे पूत्र तेजस्वी यादव यांचेदेखील नाव आरोपी म्हणून आहे. राबडीदेवी आणि तेज प्रताप यांना ईडीने सहआरोपी केले आहे. 
 
ईडीच्या चौकशीसत्रावर तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अन्य राज्यांप्रमाणेच भाजप निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी यावेळी केला. आमचा जितका छळ होईल, तितके आम्ही मजबूत होऊ, असे सांगतानाच हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. मी राजकारणात नसतो, तर मला यात ओढले गेले नसते, असेही ते म्हणाले.

Related Articles