सभागृहात मंत्री, अधिकारी अनुपस्थित; सत्ताधारी सदस्यांनीच काढले सरकारचे वाभाडे   

मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात मंत्री उपस्थित रहात नाहीत. गॅलरीत अधिकारी नसतात. ही बेपर्वाई बरोबर नाही. त्यांना समज द्या, अशी मागणी करत सत्ताधारी बाजूच्या सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर यांसह विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनीही या बेपर्वाईबद्दल सरकारचे वाभाडे काढले. तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनीही याबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करत, सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
 
सरकारकडे प्रचंड मोठे बहुमत असून विरोधकांची संख्या खूपच कमी असल्याने विधानसभेतील कामकाजाबाबत मंत्री बेपर्वाई दाखवतात, अशी तक्रार अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. कालही सकाळच्या सत्रात विरोधकांनी हा विषय उपस्थित करून आपली तीव्र नापसंती व्यक्त केली होती. यामुळे उपस्थितीत फारसा फरक पडला नाही. पण दुपारी अंदाजपत्रकी मागण्या मंजूर झाल्यानंतर स्थिती अधिक दयनीय झाली. एक-दोन मंत्री व काही सदस्य सभागृहात उपस्थित होते. अधिकारी गॅलरीही ओस पडली होती. यामुळे सत्ताधारी बाजूचे सदस्यही प्रक्षुब्ध झाले. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी या बेपर्वाईबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. सभागृहात जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना मंत्री उपस्थित नाहीत. अधिकारीही उपस्थित नाहीत. गृह खात्याच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले; तेव्हाही वरिष्ठ अधिकारी गॅलरीत उपस्थित नव्हते. पूर्वी खात्याचे सचिव,  पोलिस महासंचालक, मुंबईचे आयुक्त उपस्थित राहून सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांची नोंद घेत असत, याची आठवण देताना, सभागृहातील कामकाजाचे गांभीर्य व दर्जा कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. 

Related Articles