माणिकडोहच्या पाण्याने गाठला तळ   

पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील शेतकर्‍यांची वाढली चिंता

बेल्हे, (वार्ताहर) : कुकडी प्रकल्पातील धरणाचे हंगामी पाणी आवर्तन पंचवीस दिवस आधीच सुरू झाल्याने, पुणे-अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाईची चिन्हे आहेत. त्यात यंदा माणिकडोह धरणाने मार्च महिन्यातच तळ गाठला आहे.राजकीय दबावतंत्रामुळे पंचवीस दिवस आधीच यंदा कुकडी प्रकल्पांंतर्गत हंगामी पाणी आवर्तन सुरू केल्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. पिंपळगाव जोगा धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. माणिकडोह धरणातील पाणी साठ्याची पातळी मंगळवारी ८.५६ टक्के इतकी झाली आहे.
 
पिंपळगाव जोगा धरणांतील पाणी साठ्याने तळ गाठल्याने, धरणाच्या लाभ क्षेत्रातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गावांना एप्रिल अखेर पासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. माणिकडोह धरणाखाली कुकडी नदीच्या किनारी असलेल्या गावातील शेतकर्‍यांची धरणात कमी पाणीसाठा राहिल्याने चिंता वाढली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावात पाणीप्रश्न भेडसावू लागला आहे. माणिकडोह धरणातून सोमवारी सायंकाळी नदीपात्रातील विसर्ग कमी केला असून सध्या ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
 
पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार 
 
सद्यस्थितीत उशिरा लागवड झालेले कांदा पीक तसेच उन्हाळी बाजरी, टोमॅटो, व भाजीपाला पिकास पाण्याची गरज आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी पिके शेतात उभी आहेत. विहिरींची पाणी पातळी खोल गेल्यामुळे शेती तसेच जनावरांसाठी देखील पाणी राखून ठेवणे आवश्यक आहे. यंदा पंचवीस दिवस लवकर पाणी आवर्तन सुरू झाल्याने पुढील पाणी आवर्तनानंतर मे महिन्यात जुन्नर, पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे कुकडी डावा कालव्याचे पाणी नियोजन समितीचे सदस्य अशोक घोडके यांनी सांगितले.
 
योग्य नियोजन गरजेचे 
 
यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पुढील काही महिन्यांतील शेती व पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. परिसरातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन भविष्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलनरूपी लढा उभारणार असल्याचे खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी सांगितले.

Related Articles