युपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससीची परीक्षा होणार   

विजय चव्हाण
 
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येईल. तसेच, या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.
 
विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची सरकारला शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थी हा युपीएससी सोबत एमपीएससीची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची फेररचा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात गेल्या एका वर्षात ८५ हजार ३६३ उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्त्याही देण्यात आली असल्याची माहिती मंत्री  आशिष शेलार यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.  राज्य सरकारने गट क मधील काही पदांच्या भरतीचे अधिकारही एमपीएससीकडे दिले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त राज्य सरकारने ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने राज्यात ८५ हजार पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, एमपीएससी सदस्यांची रिकामी असेलेली तीन पदे भरण्याची कार्यवाहीही सुरू आहे.

Related Articles