अखेर महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकाची दिलगीरी   

पावणे अकरा लाखांची पाणीपट्टी; पाणीपुरवठा विभागाचा प्रताप 

पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शनिवार पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकला तब्बल पावणे अकरा लाख रुपयांच्या पाणीपट्टीचे बील पाठवून धक्का दिला होता. हे बील पाहून ज्येष्ठ नागरिकाला चक्क उपचार घ्यावे लागले होते. ही बाब उघडकीस आल्यनंतर पाणी पुरवठा विभागाने पत्र पाठवून दिलगीरी व्यक्त केली आहे.   
 
गोविंद गोरे असे ज्येष्ठांचे नाव आहे. गोरे यांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तब्बल १० लाख ७६ हजार ५९ रुपयांचे बिल पाठविले होते. या प्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. गोरे यांना काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून थकीत पाणीपट्टी भरण्याचा मेसेज आला होता. दरवर्षीची पाणी पट्टी भरलेली असताना ही थकबाकी कशाची असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे त्यांनी महापालिकेतर्फे आलेला हा मेसेज उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यात तब्बल पावणे अकरा लाख रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली होती. 
 
या बिलाची त्यांनी तपासणी केली असताना त्यांना हे बिल क्रमांक त्यांचे नसल्याचे लक्षात आले पण बिल काढताना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकण्यात आला असल्याने गोरे यांच्या नावाने थकबाकी दाखविण्यात आली आहे. या बनावट बिलाचा पत्ता हा शनिवार पेठ नवा पूल असा आहे, तर गोरे यांचा पत्ता बावडेकर टेकाडी शनिवार पेठ असा आहे. एवढी मोठी थकबाकीची रक्कम पाहून गोरे यांचे डोळे फिरले. त्यांनी त्याविरोधात महापालिका आयुक्तांसह पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. बनावट बिल तयार करून मला पावणे अकरा लाखाची थकबाकी भरण्याची नोटीस पाठवली आहे. हे बिल रद्द करून मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी त्यांना दाद देत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
 
दरम्यान, शनिवार पेठ घरांक ४८, नव महाराष्ट्र. को.हो. सोसा. या मिळकतीत आपली सदानिका आहे. नळजोड असून २८ फेब्रुवारी २०२५ अखेरचे बिल ६४ रुपये आहे असे दिसते. तर बावडेकर माधव गणेश यांचे बिल १० लाख ७३ हजार ८३४ रुपये आहे. त्यांच्या बिलाची थकबाकी बाबत ३ मार्च रोजी सकाळी ८.४ वाजता मोबाईल नंबर वर मेसेज प्राप्त झाला. आपली ज्या बिलाबाबत तक्रार आहे, ते बील बावडेकर माधव गणेश (बांधकामाचा नळजोड) यांचा आहे. थकबाकीच्या बीलावर चुकून नंबर पडल्याने ते बील आपल्याला आले आहे.  आपला मोबाईल नंबर सिस्टीममधून डिलीट केला आहे. तरी यापुढे आपणास या नळजोडांची थकबाकी बाबत मेसेज येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. असे पाणीपुरवठा विभागाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles