वाहन क्रमांक पट्ट्यांच्या कामात अडथळ्यांची शर्यत   

पुणे : वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविण्याच्या कामाला वेग येण्याआधीच अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. त्यामुळे अडथळे दूर करताना पाटी बसविण्याचे काम करणारे केंद्र, आरटीओ प्रशासन आणि वाहन मालकांना कसरत करावी लागत आहे. 
 
वाहनांना पाटी बसविण्यासाठी वेळ घेताना वाहन मालकांचा मोबाईल आरसी बुकला जोडलेले  नसल्यामुळे या कामात बराच वेळ जात आहे. तसेच वाहन मालकांचा पत्ता बदललेला असल्यास त्यात दुरुस्तीसाठीही वेळ जातो. या तांत्रिक अडचणींमुळे पाट्या बसविण्याच्या प्रक्रियेला वेग येत नसल्याचे पाट्या बसविण्याचे केंद्र चालक सांगत आहेत. बर्‍याच वेळा जे वाहन मालक पाटी बसविण्यासाठी स्वत: अर्ज भरत आहेत. मात्र वाहनाचा प्रकार निवडताना मोटार सायकल असेल, तर ते स्कुटरचा पर्याय निवडत आहेत. तर काही वाहन चालक स्वत:कडे स्कुटर असताना मोटार सायकलचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे गोंधळ वाढत आहे. 
 
पाट्या बसविण्याच्या कार्यात वाहन मालकांचा मोबाईल आरसी बुकला जोडलेला असणे आवश्यक आहे. कारण त्याच मोबाईलवर ओटीपी आल्यानंतरच पुढच्या कामाला सुरूवात होते. तसेच ज्या वाहन मालकांनी पत्ता बदलला असेल, तो पत्ता नव्याने जोडण्यासाठी बराच वेळ जात आहे. या अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी शहरात पाट्या बसविण्याची प्रक्रिया करणारे तसेच पाटी बसवून देणार्‍या केंद्रात वाढ करणे गरजेचे आहे. अन्यथा पाट्या बसविण्याची प्रक्रिया अशीच संथ गतीने सुरू राहिल्यास संपूर्ण गाड्यांना पाट्या बसविण्यासाठी दीर्घ काळ लागेल. 
 
१ एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविणे अनिवार्य आहे. प्रारंभी मार्च अखेरपर्यंत पाट्या बसविण्याची मदत देण्यात आली होती. मात्र वाहनांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत पाट्या बसविणे अशक्य असल्याने त्यात पुन्हा ३१ एप्रिलपर्यंतची मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे. मात्र ३१ एप्रिलपर्यंतची मुदतवाढही अपुरी असल्याचे पाट्या बसविण्याचे काम करणारे केंद्र चालक सांगत आहेत. 
 
तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी 
 
पुण्यातील वाहनांची संख्या पाहता शासन आणि प्रशासनाने दिलेल्या मुदतीत पाट्या बसविणे केवळ अशक्य आहे. पाटी बसविण्यासाठी वेळ घेणे, त्यानंतर पाट्या तयार करणे, पाटी तयार झाल्यानंतर संबंधित केंद्रावर जावून प्रत्यक्ष पाटी बसवून घेण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे या कामासाठी प्रशासनाने एक एक महिन्याची मुदतवाढ न देता किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी.  
- राजू घाटोळ, अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएन महाराष्ट्र राज्य. 
 
पाटी बसविणे काळाची गरज 
 
वाहनाला उच्च सुरक्षा पाटी बसविणे ही काळाची गरज आहे. वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांना याची मदत होणार आहे. मात्र दिलेल्या मुदतीत शहरातील वाहनांना पाटी बसविणे शक्य नाही. वाहन चालकांच्या मागणीप्रमाणे पाट्या बसविल्या गात आहेत. त्यामुळे पोलिसांनी वाहनांवर कारवाई करण्याची घाई करू नये. अन्यथा काळाबाजार सुरू होईल. त्याचा वाहन चालकांना त्रास होईल. 
- एकनाथ ढोले, अध्यक्ष, (पश्चिम महाराष्ट्र) विद्यार्थी वाहतूक संघटना.
 
शहरातील वाहनांची संख्या 
पूर्व नियोजित वेळ घेतलेली वाहने - ८६६४७
पाटी बसविलेल्या वाहनांची संख्या - ४४५१५
वाहन पाट्यासाठी आलेले अर्ज - २ लाख ३४ हजार ७५५

Related Articles