महिला पोलिस भरतीदरम्यान गोंधळ   

चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी,भरती प्रक्रियेला गालबोट 

पुणे : महिला कारागृह पोलिस भरतीदरम्यान बुधवारी मोठा गोंधळ उडाला. यावेळी लोखंडी प्रवेशदार तुटून पडल्याने उमेदवार मुली आतमध्ये पळत सुटल्या. या चेंगराचेंगरीत अनेक उमेदवार जखमी झाल्या; काहींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकाराबद्दल पालकांनी स्थानिक तीव्र संताप व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून रखडलेली महिला कारागृह पोलिस भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पुन्हा सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ५३१ कारागृह महिला पोलिस जागांसाठी ही भरतीप्रक्रिया पार पडत आहे. 
 
काल तीन हजारांपेक्षा जास्त मुलींनी गर्दी केली होती. गर्दीच्या रेट्याने लोखंडी प्रवेशदार तुटून पडले. त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. त्यातूनच चेंगराचेंगरी झाली. यात अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी पालकांची पोलिसांशी बाचाबाची झाली.२०२२-२३ पासून भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, नियोजनाअभावी भरती प्रक्रियेला गालबोट लागले. पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले, २९ जानेवारीपासून ही महिला पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला ५००-१००० महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते. आता, १५०० उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. अत्यंत शांतपणे भरती प्रक्रिया सुरू आहे. महिला उमेदवारांसोबत त्यांचे पालक देखील आले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास मोठी गर्दी झाली होती. काहीसा गोंधळ उडाला. मात्र, चेंगराचेंगरी झालेली नाही. 

Related Articles