युवकाला जंगलात मारहाण   

पुणे : फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने युवकाला जंगलात नेऊन त्याला विवस्त्र करून कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच, धारदार हत्याराने शरीरावर अनेक ठिकाणी ओरखडून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मारहाण केल्यानंतर, हा प्रकार कोणालाही सांगितल्यास, खून करण्याची धमकी या तरूणाला दिली.खडकी बाजार येथे राहणार्‍या १७ वर्षाच्या तरूणाने याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, वैभव ऊर्फ पांड्या आगलावे (वय २९), यश चांदणे (वय २२) यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला. खडकी येथील महादेववाडी येथील जंगलात रविवारी (१६ मार्च) दुपारी २ वाजता हा प्रकार घडला.
 
तक्रारदार तरूण हा येरवड्यातील मित्राच्या वाढदिवसाला जाण्यासाठी एसव्हीएस गार्डन येथील बस थांब्यावर उभा होता. त्याच्या ओळखीचा वैभव आगलावे येथे आला आणि चल आपण फिरुन येऊ, असे म्हणून तक्रारदार तरूणाला दुचाकीवर बसवून महादेववाडी येथील जंगलात नेले. जंगलात आधीपासूनच ८ ते १० मुले बसलेली होती. आता सापडला आता याला सोडायचे नाही, असे तक्रारदार याच्याकडे पाहून ही मुले म्हणू लागली. त्यांनी तक्रारदाराला मध्ये उभे केले आणि वैभवने यश चांदणेला व्हिडिओ कॉल लावला. त्यावेळी यश चांदणे सर्वांना सांगत होता की, त्याचे कपडे काढा व त्याला विवस्त्र करुन फटके द्या. असे सांगितले. तू अनिकेत ननवरे, निहाल गवळी यांच्यासोबत का फिरतोस, तुला मस्ती आली का, कशाला येडेचाळे करतोस, आज दाखवतोच आम्ही कोण आहे, असे म्हणून त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने विवस्त्र केले. त्यानंतर, त्याच्या पाठीवर, पायावर धारदार शस्त्राने ओरखडले. तसेच, वैभव व छोटा लोहार यांनी त्यांच्याकडील हत्याराने मानेवर व शरीरावर ठिकठिकाणी ओरखडून जखमा केल्या. 
 
त्यांच्यातील एक जण त्याची चित्रफित तयार करत होता. सर्वांनी मिळून कमरेच्या पट्ट्याने आळी पाळीने मारहाण केली. त्यावेळी सर्व जण मिळून म्हणाले की, तुला आता समजले असेल की आम्ही कोण आहोत. तू आमचे नादाला लागू नकोस, नाही तर यापेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील, असे बोलून पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुझा खून करेन, अशी धमकी दिली  आणि तक्रारदार युवकाला तसेच सोडून गेले. दुसर्‍या दिवशी तक्रारदार लंगडत चालताना पाहून त्यांच्या आईने विचारणा केल्यावर त्यांनी आदल्या दिवशी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक दिग्जिय चौगुले याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles