वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच घेणार्‍या डॉक्टरला अटक   

पुणे : कुलमुखत्यार पत्रासाठी आवश्यक असलेल्या वडिलांच्या आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणार्‍या तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. डॉ. उन्मेष सोपान गुट्टे  (वय ५४) असे या वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या नागरिकाने एसीबीकडे तक्रार दिली होती.
 
तक्रारदार यांचे मित्र अभिषेक याच्या वडिलांकडून कुलमुखत्यारपत्र तयार करुन घ्यायचे असून त्या कामासाठी त्यांनी मित्र अभिषेक यांना अधिकारपत्र दिले होते. मित्राच्या वतीने तक्रारदार हे नोंदणी कार्यालयात अर्ज देण्यासाठी गेले होते. कुलमुख्यत्यारपत्र करण्यासाठी तक्रारदाराचा मित्र अभिषेक व त्याचे वडिल दोघे जण हजर राहणे आवश्यक असल्याचे त्यांना नोंदणी कार्यालयामधून सांगण्यात आले. परंतु अभिषेक यांचे वडिल गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे ते बेडवर झोपून आहेत. तसेच, त्यांना कोणतीही हालचाल करता येत नाही. त्यामुळे कुलमुख्यत्यार पत्र बनविण्याच्या प्रक्रियेकरीता रजिस्टार कार्यालयात त्यांना हजर राहता येणार नाही, असे कळविल्यानंतर अभिषेक यांच्या वडिलांच्या आजाराबद्दल शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल, असे सांगण्यात आले. 
 
तक्रारदार हे अभिषेकच्या वडिलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याकरीता तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. उन्मेष गुट्टे यांना भेटले. डॉ. गुट्टे याने अभिषेकच्या वडिलांचे आजाराबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याकरीता तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ही तक्रार १७ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. तक्रारीची १८ मार्च रोजी पडताळणी केली असता डॉ. उन्मेष गुट्टे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना डॉ. गुट्टे याला पकडण्यात आले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय पवार अधिक तपास करीत आहेत.

Related Articles