वसतीगृहात दारू पिणार्‍या मुलींवर शिस्तभंगाची कारवाई   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहात दारू पिणार्‍या व सिगारेट ओढणार्‍या मुलींवर विद्यापीठ प्रशासनाने शिस्तभंग केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहेे. या मुलींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून उर्वरित दिवस चांगल्या वर्तवणूकीसाठी संबंधित मुलींकडून लेखी हमीपत्र लिहून घेतले आहे, असे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितले. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात मुली अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. एका विद्यार्थीनीला तिच्याच रूम मधील मुली त्रास देत असल्याची लेखी तक्रार विद्यापीठाकडे देण्यात आली. मात्र, त्यावर विद्यापीठ प्रशासनाने यावर कारवाई न केल्याने संबंधित विद्यार्थीने प्रसार माध्यमांसमोर येऊन सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. पिडीत मुलीला बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलींवर कारवाई व्हावी,अशी मागणी अखील भारतीय भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली. त्यानंतर बुधवारी विद्यापीठाने दोषी मुलींवर कारवाई केली. 
 
डॉ. ज्योती भाकरे म्हणाल्या, दोषी विद्यार्थीनींवर शिस्तभांगाचे नियम मोडल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. संबंधित मुलींच्या पालकांना बोलावून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच पालकांकडून व मुलींकडून तसेच विभाग प्रमुख यांच्याकडून या मुली उरलेल्या कालावधीत चांगल्या वागतील याबाबत हमीपत्र लिहून घेतले आहे. तसेच या मुलींचे समुपदेशन केले जात आहे. नियमाप्रमाणे संबंधित मुलींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

Related Articles