पृथ्वीची धाडसी लेक (अग्रलेख)   

दीर्घ प्रतिक्षेनंतर अंतराळ वीरांगना सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरुप पोहोचल्या आहेत. त्या आणि त्यांचे सहकारी बॅरी बुच विल्मोर यांच्या परतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. सुनीता विल्यम्स या मूळ भारतीय वंशाच्या महिला. त्यामुळे त्यांना अंतराळ यानातून परत येण्यास होणारा विलंब तमाम भारतीयांची चिंता वाढविणारा होता. ज्या मोहिमेद्वारे सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या ते होते नासाचे ‘क्रू फ्लाईट टेस्ट मिशन’. अवघ्या आठ दिवसांची ती मोहिम होती. ५ जून २०२४ रोजी ती मोहिम सुरु झाली. आठ दिवसांमध्ये परत येणे अपेक्षित असलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून राहावे लागले. स्टारलायनर यानातून ते अंतराळ स्थानकात पोहोचले, मात्र तेथे यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिम लांबली. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना घेऊन येणारे कॅप्सुल काल पहाटे फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित उतरले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांची जागा ‘क्रू १०’च्या अंतराळ वीरांनी घेतली आहे. अंतराळ स्थानकात विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले प्रयोग नासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 
 
आव्हानात्मक वास्तव्य
 
ही यशस्वी मोहिम मानवाच्या जिद्दीची आणि अपयशावर मात करण्याच्या विजुगिषु वृत्तीची प्रतीक आहे. अंतराळ स्थानकातून सुनीता विल्यम्स यांचा नासाबरोबर कायम संपर्क असला तरी अनिश्चिततेचे सावट असताना तेथील वास्तव्य आव्हानात्मक होते. सुनीता यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उड्डाणांचा तीन हजार तासांहून अधिक अनुभव आहे. त्याच बळावर त्यांनी मोहिमेसाठी निवड झाली होती. त्यांच्या परतीमध्ये आलेले अनेक अडथळे हे नासाकरता पुढील मोहिमांसाठी धडे ठरावेत. संशोधनाच्या क्षेत्रात नवी शिखरे गाठण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत राजकीय मतमतांतरांना स्थान असता कामा नये. यावेळी माजी राष्ट्रप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यामुळे अंतराळ स्थानकातून सुनीता आणि विल्मोर यांना परत आणण्यात अडथळा आला, असा जाहीर आरोप विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनीही तेच मत मांडले. सहा महिन्यांपूर्वीच यान पाठवून सुनीता विल्यम्स यांना परत आणणे शक्य होते, पण बायडेन यांनी त्यासाठी परवानगी दिली नाही, अशी पोस्ट अ‍ॅलन मस्क यांनी एक्स हँडलवर टाकली होती. स्पेस एक्सचे क्रू कॅप्सुल उड्डाणानंतर दुसर्‍या दिवशी अनतराळ स्थानकात पोहोचले आणि त्यातील चौघांचे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी स्वागत केले. स्थानकात अडकलेले दोघेही पृथ्वीवर परतण्याचा क्षण जवळ आला आहे, हे सांगणारी ती घटना होती. याआधी कल्पना चावला हिला अंतराळ मोहिमेतून परतताना प्राण गमवावे लागले होते. बावीस वर्षांपूर्वीची ती घटना विशेषतः भारतीय अद्याप विसरु शकलेले नाहीत. म्हणूनच सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी सुरक्षित परत यावा, यासाठी अनेकांकडून मनोमन प्रार्थना केली जात होती. परतीचा प्रवास तेवढाच आव्हानात्मक होता. पृथ्वीच्या बाह्य वातावरणात प्रवेश करतानाचा टप्पा अतिशय कठीण मानला जातो. त्याच टप्प्यात कल्पना चावला हिच्या यानास अपघात झाला होता. सुनीता विल्यम्स परत येत असताना पृथ्वीच्या कक्षेत शिरताना कॅप्सुलचा नियंत्रण कक्षाबरोबर संपर्क तुटला आणि चिनतेचे काळे ढग दाटून आले. तपमानात असंख्य पटीने वाढ झाल्याने ते घडले. मात्र सुदैवाने सात मिनिटांनंतर स्पेस एक्सच्या कॅप्सुलचा नासाच्या नियंत्रण कक्षाशी पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित झाला. अंतराळात दीर्घ काळ राहून सुनीता विल्यम्स यांनी नवा विक्रम नोंदवला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या टप्प्याची ओळख म्हणून यापुढे त्यांच्याकडे पाहिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येण्याआधीच त्यांना पत्र पाठवून भारत भेटची निमंत्रण दिले आहे. पराक्रमी कन्येचे भारतात स्वागत करताना देशाला अत्यानंद होईल, या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आवश्यक असलेल्या विश्रांतीनंतर आणि पृथ्वीवरील दिनचर्या सुरळीत झाल्यावर सुनीता विल्यम्स यांचे पाऊल भारताच्या भूमीवर पडेल तो क्षणही अविस्मरणीय ठरेल, यात शंका नाही. 

Related Articles