वाचक लिहितात   

माध्यमांची संवेदनशून्यता
 
मागील आठवड्यात मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडली. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. २४ तास ब्रेकिंग न्युज दाखवणार्‍या न्युजचॅनल वाल्यांना या बातमीची दखलही घेऊशी वाटली नाही. सर्व सामान्य गोरगरिबांच्या मृत्यूचे येथे कोणालाच काही देणेघेणे नाही, गरीबच होता त्याच्या मृत्यूची दखल घ्यायला तो काय सेलिब्रिटी होता का ? असाच विचार येथील यंत्रणा करत असतील म्हणूनच गोरगरिबांच्या निधनानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणी पुढे येत नाही.  कोणत्याही निधनाच्या घटनेकडे सरकार बरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
पर्यावरणस्नेही पर्याय काय?
 
केसरी दि.१३ मार्च मधील पीओपीसंदर्भात समितीचा निर्णय येईपर्यंत न्यायालयाकडे मुदत मागणार हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं रास्त वाटलं. कारण गणेशमूर्तीकारांसाठी पीओपी बंदी हा दरवर्षीचा आयत्या वेळचा विषय असतो. खरं तर योग्य पर्यायांचा विचार न करताच ’प्लास्टर ऑफ पॅरिस’ वर ’बंदी’ हा उपाय नाही हे त्यातील काही तज्ञांचंही मत आहे. पीओपी हीही मातीच असली तरी शाडूपेक्षा मूर्ती पाण्यात विरघळायला जरा वेळ घेते. त्यामुळे हल्ली बय्राच कुटुंबांना धातूच्या मूर्तीचा पर्याय मूर्ती पुनर्स्थापना करून पुजण्यास योग्य वाटतो. परंतु यात खरोखरच मातीच्य मूर्तीकारांचं नुकसान असेल तर पुण्याच्या एन्.सी.एल्.नं काही वर्षांपूर्वी सुचवलेला उपाय म्हणजे बेकरीत वापरल्या जाणाय्रा अमोनियम बायकार्बोनेट (सोडा) व पाण्याच्या मिश्रणात ’प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीघे विसर्जन करून पाहावे. ’प्लास्टर ऑफ पॅरिस’ची विल्हेवाट लावणे ही तेवढी मोठी डोकेदुखी नसल्याचा निर्वाळा सरकारनं तज्ञ समितीकडून करून घेऊन, सोबतच पर्यावरणस्नेही पर्याय राबवण्याचे प्रयत्न करावेत आणि मूर्तिकारांना दिलासा द्यावा.
 
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
 
आलबेल नाही...
 
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही.. या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिसून येत आहे. दिल्लीत एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपताच शिंदेंनी दिल्ली गाठली आणि डोक्यावर पगडी घालून हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारला. ही वाटते तेवढी सहज सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे-पवार यांची भेट उद्धव ठाकरे यांना झोंबली असताना ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत संपर्क करतात यातून काय साध्य करतात? हाही तितकाच चर्चेचा विषय. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना वगळण्यात आल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला की काय? अशी शंका मनात येत असताना लगेचच त्यांना स्थान देण्यात आले. एकंदरीत पाहता राजकारणात सर्व काही आलबेल चालले नाही असेच म्हणावे लागेल. ठाकरे घायाळ झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये काय होईल याचे मात्र काही सांगता येत नाही.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  
 
मराठीतून परीक्षा, योग्य निर्णय
 
राज्य लोकसेवा आयोगाच्या च्या सर्वच परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे नियोजन केले जाईल.’ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच विधानपरिषदेत दिली आहे. राज्यात अभियांत्रिकी, कृषीविषयक व वैद्यकशास्त्रविषयक परीक्षा मग त्या लोकसेवा आयोगामार्फत असो वा राज्य शासनाधिन संस्थेमार्फत असो याबाबत जागृती करून तसेच या विषयांची उपलब्ध इंग्रजी  पुस्तके  मराठीतही उपलब्ध झाल्यास मराठीतून अभ्यास करणार्‍यांचे प्रमाण निश्चितच वाढेल यात शंका नाही. तसेही नवीन शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सुत्रानूसार मातृभाषेस (मराठी) प्राधान्य दिल्यास अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कृषी व अन्य विभागातील 
परीक्षार्थींना आणि अभ्यासकांनाही त्याचा लाभ होईल हे निश्चित !
 
सत्यसाई पी.एम., गेवराई (बीड)
 
पोहताना दक्षता घ्या 
 
आता उन्हाळा सुरु झाला आहे. काही दिवसातच मुलांच्या परीक्षा संपतील. मग मुलांना सुट्टीचे वेध लागतात. अनेक मुले ग्रुप करून पोहावयास जातात. खरे तर यातील कित्येक मुलांना पोहावयास सुद्धा येत नसते. अशा वेळी विनाकारण ही मुले पाण्यात जाऊन आपल्यावर संकट ओढवून घेतात अशा वेळी आई वडिलांनी अत्यंत सावधानता बाळगून ज्यांना पोहावयास येत नसेल अशा मुलांना मनाई करणे जरुरीचे आहे. ज्या मुलांना पोहावयास येते त्यांनाही जेथे पोहावयास जाणार ती  जागा व त्यातील बारकावे माहिती पाहिजेत माहित नसेल तर आजूबाजूच्या लोकांकडून माहित करून घेणे जरुरीचे आहे. शहरी भागात पोहण्याचे तलाव असतात तेथे त्यामानाने बरीच सुरक्षा असते. तेथेही ट्रेनर असल्याशिवाय पाण्यात उतरू नये. पालकांनी याबाबत सर्तक राहणे अत्यंत आवश्यक आहे
 
शांताराम वाघ, पुणे

Related Articles