राज्यात चार दिवस पाऊस पडणार   

मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा; निम्या राज्याला यलो अलॅर्ट

पुणे : बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चार दिवस वीजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याचा वार्‍यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी गारांचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे निम्या राज्यात आज (गुरूवारी) यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. 
 
येत्या शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गगोदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ तसेच रविवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया, नागपूर, वर्धा येथे मेघगर्जनासह वीजाच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. या सर्व जिल्ह्यांना यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. तसेच हिंगोली, परभणी, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथे मेघगर्जनासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे असणार आहे. कमाल तपमानात येत्या ३ ते ४ दिवसांत २ ते ३ अंशाने घट होणार आहे. 
 
मागील २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. किमान तपमानातही बहुतांश ठिकाणी उल्लेखनीय वाढ झाली आहे. काल ब्रह्मपुरी येथे उंच्चांकी ४१.५ अंश कमाल, तर जळगाव येथे निचांकी १५.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली. कोकणात मात्र पुढील आठवडाभर हवामान कोरडे असणार आहे. चार दिवसानंतर मात्र संपूर्ण राज्यात कोरडे हवामान असणार आहे. कमाल आणि किमान तपमानातही वाढ होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
पुण्यात ढगाळ वातावरण 
 
पुणे शहर आणि परिसरातील कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. लोहगाव येथे ४० अंश कमाल, तर शिवाजीनगर, ३९, मगरपट्टा ३९, कोरेगाव पार्क ३९, एनडीए ३८ आणि पाषाण येथे ३८ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस आकाश नीरभ्र असणार आहे. त्यानंतर मात्र सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ होणार आहे. कमाल आणि किमान तपमानात वाढ कायम राहणार असल्याने ऊन आणि उकाडाही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

 

Related Articles