इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात चारशेहून अधिक बळी   

चारशेहून अधिक जणांचा मृत्यू; युद्धबंदी संपुष्टात ?

डेर अल बलाह : गाझा पट्टीत इस्रायलने मंगळवारी सकाळी जोरदार हवाई हल्ले केले. गाझातील सर्व भागांत एकाच वेळी हल्ले चढविले असून त्यात ४०४ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. त्यात महिला आणि मुलांचा  अधिक समावेश आहे, असा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला. हवाई हल्ल्यांमुळे इस्रालयने युद्धबंदी मोडल्याचे मानले जात आहे. 
 
इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये जानेवारीपासून युद्धबंदी झाली होती. सुमारे १७ महिन्यांच्या प्रदीर्घ युद्धानंतर ती लागू झाली होती. त्या अंतर्गत  हमासने इस्रायली ओलिसांची आणि इस्रायलने शेकडोच्या संख्येने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका देखील केली होती. दरम्यान, हमास दहशतवाद्यांनी युद्धबंदीच्या नियमांत बदल करण्याची इस्रायलची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे संतापलेले इस्रायलचे पंतप्रधान  बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझात हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गाझातील विविध भागांत एकाच वेळी हवाई हल्ले चढविण्यात आले. अधिकार्‍यांनी सांगितले की, हवाई हल्ल्यांची व्याप्ती आणखी वाढविली जाईल. इस्रायलने हल्ले करण्यापूर्वी अमेरिकेशी चर्चा केली होती, असा दावा व्हाइट हाऊसने केला. 
 
पूर्व गाझा रिकामी करा, असा आदेश इस्रायलच्या लष्कराने तेथील नागरिकांना दिला होता. त्यामध्ये उत्तरेकडील शहर बेईत हनोन आणि दक्षिणेकडील समुदायांचा समावेश होता. त्यांना गाझातील मध्यवर्ती भागात जाण्यास सांगितले होते त्या माध्यमातून अपेक्षित ठिकाणी कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हमासचे दहशतवादी युद्धबंदीचा गैरफायदा घेत आपले सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असल्याचे नेततन्याहू यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. 
 
रमजानचा पवित्र महिना सध्या सुरू आहे. यापूर्वीच्या हल्ल्यात अगोदरच गाझा पट्टीची प्रचंड नासधूस झाली असून हजारो पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. लाखोंच्या संख्येने निर्वासित झाले आहे. आता इस्रायलने युद्धबंदीतील नियमात बदल करण्याची टूम काढून गाझात पुन्हा हल्ले केले आहेत. त्यामुळे १२ पेक्षा अधिक इस्रायली ओलिसांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. हमासच्या ज्येष्ठ अधिकार्‍याने इशारा दिला की, इस्रायलने युद्धाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे आम्ही ओलिसांना यमसदनी पाठवणार आहोत. 
 
दरम्यान, हवाई हल्ल्यात चार दहशतवादी म्होरके मारले गेले आहेत. हमासने हवाई हल्ल्यांना प्रत्त्युत्तर तातडीने दिलेले नाही. त्यांना अजूनही युद्धबंदी करार सुरूच राहील, अशी अपेक्षा आहे. ओलिसांच्या सुटकेसाठी त्यांच्या नातेवाइकांनी निदर्शने करण्याचे ठरवले आहे. तसेच अंतर्गत सुरक्षा संस्थेच्या प्रमुखांची हकालपट्टी करण्याची घोषणा नेतन्याहू यांनी नुकतीच केली आहे. या सर्व घडामोडींचा दबाव नेतन्याहू यांच्यावर आल्यामुळे त्यांनी गाझात हवाई हल्ले केले असल्याचे मानले जात आहे. हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपाची सुनावणी देखील थांबली आहे. 

Related Articles