एक हजार कोटींचा मद्य गैरव्यवहार   

तामिळनाडूत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंसह निदर्शक ताब्यात

चेन्नई : तामिळनाडूतील सरकारी मद्याची किरकोळ विक्री करणार्‍या तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (टीएएसएमएसी) मध्ये एक हजार कोटींचा मद्य गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रश्नी निदर्शने करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंसह समर्थकांना पोलिसांनी सोमवारी 
ताब्यात घेतले. 
 
तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (टीएएसएमएसी) मुख्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली काल निदर्शने केली.  कॉर्पोरेशनमध्ये सुमारे एक हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कॉर्पोरेशनवर छापे घातले होते. तेव्हा गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता.
 
दरम्यान, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने नुकतेच अंदाजपत्रक सादर केले. त्यात रुपयाचे चिन्ह तामिळ भाषेत लिहिले होते. ईडीच्या छाप्यानंतर उघड झालेल्या गैरव्यवहारापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी रुपयाचे चिन्ह बदलले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. निदर्शने करण्यासाठी अण्णामलाई काळ्या पोषाखात घराबाहेर पडले. तेव्हा त्यांच्यासह तामिळसाई सुंदरराजन आणि समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे. 

Related Articles