राज्य आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत कर्ज किंवा महसुली तुटीची चिंता नको   

अजित पवार यांची ग्वाही

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. कर्ज आणि महसुली तूट नियंत्रणात आहे. त्यामुळे याबाबतची टीका अनाठायी असल्याचे सांगताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी अंदाजपत्रकी सर्वसाधारण चर्चेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट या योजनेची बँकांशी सांगड घालून महिलांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
 
मागच्या सोमवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावरील सर्वसाधारण चर्चेत विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी राज्याची आर्थिक स्थिती, कर्जाचा डोंगर, महसुली तुटीबाबत चिंता व्यक्त केली होती. चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण निर्धारित मर्यादेच्या खूप कमी असल्याचे सांगितले. विकास प्रकल्पासाठी कर्ज घेणे आवश्यक असते. अंदाजपत्रकातून निधी देऊन प्रकल्प करायचे ठरवले तर बराच कालावधी लागतो व प्रकल्पाचा खर्च वाढतो. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यामुळे आपण उभारू शकलो.
 
केंद्र सरकारनेही बारा हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्याची महसुली तूट ही मर्यादेच्या आतच आहे. राज्याचे महसुली उत्पन्न वाढले आहे.  २०२४-२५ या वर्षात ३ लक्ष २८ हजार कोटी एवढा जीएसटी जमा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत तो १२.३ टक्के जास्त आहे. राजकोशीय तूटही ३ टक्क्यांच्या मर्यादेत आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून सिंहाचा वाटा राहिलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी निश्चित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.  
 
नवी दिल्लीत सांस्कृतिक भवन उभारणार  
 
नुकतेच नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात नवी दिल्लीत राहणार्‍या  मराठी भाषिकांना एकत्र जमण्यासाठी, स्नेहमेळावे साजरे करण्यासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा संकल्प मी बोलून दाखवला होता. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू असून या आश्वासनाची मी नक्कीच पूर्तता  करेन, असे पवार यांनी जाहीर केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे क्रांतीकारक, स्वातंत्र्यसेनानी आणि प्रतिसरकार स्थापन करणारे क्रांतीवीर नानासिंह पाटील यांच्या जयंतीचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अशा या क्रांतीकारी व्यक्तीमत्वाच्या स्वातंत्र्यसेनानीचे, त्याच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक बहे तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी उभारण्यात येईल, अशी घोषणा पवार यांनी भाषणात केली.
 
टाळकी २० आणि वल्गना मुख्यमंत्रिपदाच्या!
 
अंदाजपत्रकावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी नेहमीच्या शैलीत राजकीय टोलेबाजी केली. काँग्रेसने नाना पटोले यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यावे व अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री व्हावे, अशी ऑफर दिली होती. त्याची खिल्ली उडवताना अजित पवार यांनी, काहीजण उगाच काहीही बोलतात, आमच्याकडे या मुख्यमंत्री करू म्हणतात. पण, तुमच्याकडे माणसेच नाहीत. तुमच्याकडे १५-२० टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणता, असा टोला त्यांनी लगावला. मागील दोन वर्षांत सरकारने केलेले काम बघून राज्यातील जनतेने महायुतीला भरभरुन प्रेम दिले आहे. पुढील पाच वर्षे या सरकारला ब्रम्हदेव आला तरी धक्का लावू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles