हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करा   

विधानपरिषदेत सत्ताधार्‍यांचा गोंधळ

विजय चव्हाण
 
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाप्रमाणे क्रूर शासक आहेत, असे विधान करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सत्ताधार्‍यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे सभापती राम शिंदे यांनी सुरुवातीलाच सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.फडणवीस हे औरंगजेबाप्रमाणे क्रूर शासक आहेत, असे विधान सपकाळ यांनी केले होते. या विधानाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सभागृह सुरू होताच भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली.    
 
सभापती राम शिंदे यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्या आश्वासनाने सत्ताधार्‍यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सकपाळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. सकपाळ यांच्यावर कारवाईची मागणी करत त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच तापला असून हिंदू संघटना कबर हटवण्यासाठी आंदोलन करत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, सपकाळ यांनी रविवारी फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. या वक्तव्याचे पडसाद काल विधान परिषदेत उमटले. विधान परिषदेचे कामकाज सकाळच्या सत्रात सुरू झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित करत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. 
 
हे सरकार औरंगजेबी वृत्तीचे  
 
सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केलेले विधान हे राज्य सरकारबद्दल होते. मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांना वैयक्तिक असे काही बोलायचे नव्हते. प्रश्नोतराच्या वेळी औरंगजेबाचा विषय निघाला आणि त्यानंतर राज्य सरकारबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावेळी सपकाळ यांनी आताचे हे राज्य सरकार औरंगजेबी वृत्तीचे आहे, असे म्हटले, अशी माहिती भाई जगताप यांनी सभागृहाला दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून बोलताना ही तुलना केल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांबाबत ते बोलले असतील तर ते चुकीचे आहे. कोणावरही अशी वैयक्तिक टीका करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मात्र, सरकारच्या वतीने महसूलमंत्री बावनकुळे यांनी चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने प्रकरण निवळले.

Related Articles