पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील प्रवास तीन टक्क्यांनी महागणार   

पुणे : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर आणि ‘एमएसआरडीसी’ च्या अखत्यारीत असलेल्या पुणे-मुंबई द्रुतगतीवरील प्रवास येत्या १ एप्रिलपासून ३ टक्क्यांनी महागणार आहे. त्याचा फटका मात्र या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे. 
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी १ एप्रिलला टोलच्या दरात वाढ करत असते. ही वाढ वाहनांच्या प्रकारानुसार असते. अवजड वाहनांना अधिकचा टोल द्यावा लागतो. सध्या होणारी वाढ तीन टक्के असल्याची माहिती सुत्रांनी दिली. चारचाकीच्या एकेरी प्रवासावर पाच रूपयांनी वाढ होणार आहे. परतीचा प्रवास करताना चारचाकीसाठी १० रूपये जास्तीचा दर आकारला जाणार आहे. अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी १५ ते २० रूपयांनी वाढ होणार असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले. राज्यातील अत्यंत महत्त्वाची शहरे म्हणून मुंबई आणि पुण्याची ओळख आहे. तसेच अनेक महत्त्वाचे कार्यालये या दोन शहरात आहेत. त्यामुळे दोन्ही शहरातून ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या लाखापेक्षा अधिक आहे. पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग वेगवान प्रवासासाठी सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. येत्या १ एप्रिलपासून या मार्गावरून प्रवास करणार्‍या विविध प्रकारच्या वाहनांना अधिकचा टोल भरावा लागणार आहे. 

Related Articles