मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक   

जयवंत कोंडिलकर यांचे प्रतिपादन 

पुणे : पूर्वोत्तर सीमा भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार खोलवर रुजविणे गरजेचे आहे. आरोग्य, शिक्षण सुविधा, कौशल्य विकास, स्थानिक संस्कृतीचे संवर्धन, युवकांच्या क्षमतांचा विकास यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. स्थानिकांमध्ये आपुलकी निर्माण करून आपलेपणाची भावना निर्माण करता येईल. त्यासाठी सामुदायिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहेत. असे मत पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी व्यक्त केले. 
 
केशव माधव विश्वस्त निधी तर्फे ‘धुमसता मणिपूर’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयवंत कोंडविलकर बोलत होते. हे व्याख्यान एरंडवणे येतील पटवर्धन बाग, सेवा भवनच्या मुकुंदराव पणशीकर सभागृहात झाले. यावेळी संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे श्रीपाद दाबक, केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे, विश्वस्त योगेश कुलकर्णी, रवि जावळे आदी उपस्थिती होती. 
 
कोंडविलकर म्हणाले, ‘वसुदैव कुटुंबकम्’ या मूल्यांच्या आधारे भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल, तर नागरिकांच्या मनामध्ये प्रखर एकात्मतेची ज्योत सतत धगधगत रहायला हवी. पूर्वोत्तर सीमा भागातील वांशिक भेद, फुटीरतावाद, दहशतवादाचे सावट, मादक द्रव्यांचा व्यापार, रोजगाराच्या अल्प संधी, आणि त्यातून बिघडलेला सामाजिक समतोल, राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांचा अभाव, वांशिक वेगळेपणाची भावना आणि पाश्चात्यशक्तींचा सांस्कृतिक दबाव अशा विविध समस्यांमुळे भारताचा पूर्वोत्तर प्रदेश विशेषत: सीमा भाग नेहमीच धुमसता असल्याचे दिसून येते. २१ व्या शतकातील बदलणारी भू- राजकीय समीकरणे आणि हिंद-पॅसिफिक भागाचे वाढते महत्व या बाबींचा विचार करता पूर्वोत्तर भारत सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरतो. यामुळेचे तेथील समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करणे गरजेचे आहे. डॉ. दीपक शिकारपूर, प्रा. श्रुती मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले. 

Related Articles