चांद्रयान-५ मोहिमेला हिरवा कंदील   

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चांद्रयान-५ मोहिमेला मान्यता दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख व्ही. नारायणन यांनी याबाबतची माहिती दिली.चांद्रयान-३ मोहिमेत २५ किलो वजनाचा रोव्हर प्रज्ञान चंद्रावर पाठवण्यात आला होता. चांद्रयान-५ मोहिमेत २५० किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाईल, असेही ते म्हणाले. या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे.
 
इस्रोने चांद्रयान- ३ मोहिमेच्या माध्यमातून इतिहास घडविला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश ठरला होता. २०२७ मध्ये चांद्रयान- ४ मोहीम राबविली जाणार आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळाने यास मान्यता दिली होती. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर अंतराळयान उतरवणे, चंद्राच्या मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करणे तसेच त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हा आहे. या मोहिमेसाठी २,१०४ कोटी कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
 
२००८ मध्ये चांद्रयान- १ ने चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायने, खनिजे यशस्वीरीत्या शोधून काढली आणि चंद्राचे भू-स्थानिक मॅपिंग देखील केले. चांद्रयान- २ मोहिमेने ९८ टक्के उद्दिष्ट साध्य केले. चांद्रयान- ३ च्या माध्यमातून, यशस्वी लँडिंग आणि रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती गोळा केली जात आहे. चांद्रयान- २ मोहिमेअंतर्गत पाठवण्यात आलेला रिझोल्यूशन कॅमेरा अजूनही चंद्राची शेकडो छायाचित्रे पाठवत आहे. फक्त तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान- ५ मोहिमेला मंजुरी मिळाली आहे.

Related Articles