मदतीच्या बहाण्याने दागिने लांबवले   

लोहमार्ग पोलिसांकडून चोराला अटक

पुणे : इंदूर-दौंड एक्सप्रेसने जाणार्‍या प्रवाशाला बॅगा उतरवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने बॅगेतील ११ लाखांचे दागिने लांबवणार्‍या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून १० लाख ८४ हजारांचे दागिने जप्त केले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले.
 
सुमितकुमार सतवीरसिंह (वय ३०, सुलतानपुरी, सनी बाजार रस्ता, दिल्ली, मूळ रा. जाटलुहारी, ता. भवानी खेडा, जि. भवानी, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी, शिरीष विठ्ठलराव शितोळे (वय ७३, देवारा, मध्य प्रदेश) यांनी तक्रार दिली आहे. शितोळे हे इंदौर-दौंड एक्स्प्रेसने १३ जानेवारी रोजी दुपारी येत होते.
 
पुणे रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर, चौघांनी त्यांना सामान उतरवण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्या हातातील बॅग घेतली. त्यानंतर, रेल्वेतून उतरताच शितोळे यांना बॅग परत करून ते निघून गेले. त्यावेळी, शितोळे यांना ट्रॉली बॅगची चेन उघडी असल्याचे दिसले. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता, बॅगेतील ११ लाख २८ हजार १५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेली पर्स नव्हती. यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच तपास पथकाने ५० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. सीसीटीव्हीतील संशयितांच्या हालचालींवरून आरोपी निष्पन्न केले. 

Related Articles