नागपुरात जाळपोळ; पोलिसांवर दगडफेक   

नागपूर : नागरपूर येथील महाल गांधी गेट परिसरात एका धार्मिक स्थळाची चादर, ध्वज जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणांच्या दोन गटात सोमवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांवर जमावाकडून दगडफेक केली जात असल्याने पोलिसांच्या बाजूने देखील जमाव पांगविण्यासाठी अश्रूधूर सोडण्यात आल्या. 
 
नागपूरमध्ये सोमवारी दुपारी काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागणी केली जात होती. त्यावेळीही, दोन गटात किरकोळ वाद झाला होता. नागपूरमधील दुपारचा किरकोळ वाद मिटल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाजवळ पोहोचला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. दुपारी झालेल्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता, या घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसर्‍या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणार्‍या दोन्ही गटांना वेगवेगळे केले. शहरातील चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरु झाली आहे. त्यामुळे, पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी बल प्रयोग करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्याने पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या वापरण्यात आले आहे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी होणारे शहर आहे. नागपूरच्या जनतेला शांततेचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 

Related Articles