रक्तरंजित संघर्ष (अग्रलेख)   

बलूचिस्तानमधील संघर्षाची व्याप्ती वाढत चालली आहे. जाफर एक्स्प्रेसच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. यात नव्वद पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा ‘बीएलए’चा दावा आहे. यापूर्वी जाफर एक्स्प्रेसमधून अपहरण करण्यात आलेल्या २१४ सैनिकांना ठार केल्याचे ‘बीएलए’ने जाहीर केले. मात्र, पाकिस्तान सरकारने ते मान्य केलेले नाही. अर्थात ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. भारताबरोबर झालेल्या आजवरच्या युद्धात आपला कधीही पराभव झाला नाही, असाच पाकिस्तानचा पवित्रा असतो. याला थोडासा अपवाद १९७१चा! एक संपूर्ण प्रांतच वेगळा झाल्याने तेव्हाचा पराभव मान्य करण्याशिवाय पाकिस्तानसमोर पर्याय नव्हता. सैनिकांचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत; पण आमचे सैनिक मारले गेले नाहीत, अशी भूमिका घेत पाकिस्तान सैनिकांचा अवमान करत आहे. कारगिल युद्धामध्येही तसेच घडले. आपल्या प्राणाची आपल्याच लष्कराला किंमत नाही, ही भावना त्या देशाच्या लष्करामध्ये प्रबळ होत असून लष्कराची नोकरी सोडून देण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. नीतिधैर्य हरवलेले हे सैन्य स्वातंत्र्याच्या आकांक्षेने पेटून उठलेल्या बलुची समुदायासमोर फार काळ टिकाव धरु शकणार नाही. इतर देशांकडे सैन्य असते, पाकिस्तानात सैन्याकडे देश आहे, असे सार्थपणे म्हटले जाते.बलूचिस्तान लिबरेशन आर्मीला तहरिक ए तालिबानची मदत असल्याचे स्पष्ट होत आहे. बलूचिस्तानलगत इराणची सीमा असून सीमेच्या पलीकडे देखील बलूच प्रांत आहे. तो सिस्तान बलुचिस्तान नावाने ओळखला जातो. बलूचींना स्वातंत्र्य हवे आहे, तर खैबर पख्तुनख्वासह तहरिक ए तालिबानला बृहत् अफगाणिस्तानात रस आहे. 
 
आत्मघातकी हल्ले
 
आपल्या ताब्यातील देशाची या सैन्याने धूळधाण उडवली. लष्करी अधिकारी ऐषोआरामात जीवन जगणार आणि देशातील नागरिकांच्या हाती कटोरा, हे चित्र देश म्हणून उभे राहण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरला, याचेच द्योतक. भूमिपुत्रांचे हित, हाच कोणत्याही देश-प्रदेशातील स्थैर्याचा प्रमुख निकष. तोच पाकिस्तानच्या शासकांनी सातत्याने धुडकावला. पूर्व बंगालच्या रहिवाशांच्या इच्छा-आकांक्षांना प्रतिसाद देण्याऐवजी तेथे उर्दू भाषेच्या अनाठायी आग्रहासाठी टोक गाठले गेले आणि शेवटी तो भाग पाकिस्तानला गमवावा लागला. देशाच्या ऐक्य आणि अखंडतेपेक्षा आपला अहंकार आणि अस्मिता महत्त्वाच्या वाटल्यानेच लोकांनी कौल देऊनही शेख मुजिबूर रेहमान यांना अखंड पाकिस्तानचे पंतप्रधानपद नाकारण्यात आले. अहंकार आणि कथित अस्मितेमुळे देश तुटला तरी त्याची पर्वा न करण्याची ती कायमची मानसिकता आहे. बलूचिस्तानला सोबत ठेवण्यात पाकिस्तानच्या शासकांना सातत्याने येणार्‍या अपयशाचे तेच कारण आहे. कुठे आत्मघातकी हल्ले झाले, दुर्घटना घडविली गेली तर भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’च्या नावाने ओरड करणे हा मार्ग नाही. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांमधील अशांतता आणि अस्वस्थतेचा सामना केला. विशेषतः ईशान्येकडील राज्यांचे उदाहरण यासंदर्भात देता येईल. नागप्रदेश आणि मिझोराममधील बंडाळी कधी थांबेल, याचे भाकित वर्तविणे देखील एकेकाळी कठीण होते; पण बंडाळी आहे म्हणून भारताने तेथील भूमिपुत्रांना लक्ष्य केले नाही. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकीकडे बळाचा वापर सुरु ठेवतानाच चर्चा आणि संवाद हा देखील भारताचा प्राधान्यक्रम होता. पाकिस्तानच्या चिथावणीमुळे पंजाब पेटून उठल्यानंतर संवादातूनच सरकारने  तेथे शांतता प्रस्थापित केली. काश्मीरच्या बाबतीत त्या- त्या वेळच्या केंद्रीय सरकारने याच रीतीने पावले उचलली. या पार्श्वभूमीवर बलूचिस्तानमध्ये सुरु असलेला वंशविच्छेद आणि हजारो लोकांना गायब करणे, हे पाकिस्तानचे तंत्र दोन देशांच्या भूमिकांमधील अंतर दाखवते. ‘आम्ही पाकिस्तान निर्माण केला’, हा दिल्ली, उत्तर भारतातून आताच्या पाकिस्तानात गेलेल्यांचा अहंगंड स्थानिक अस्मितांच्या मुळावर आला. बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि सिंध पाकिस्तानच्या संकल्पनेशी जोडले गेले नाहीत, यामागची कारणे ती आहेत. मुहाजीर आणि पंजाबी भाषक यांच्या मानसिकतेतून पाकिस्तानच्या फाळणीची बीजे पेरली गेली. आता बलुचिस्तानच्या संघर्षात सिंधू देश आर्मीचा सहभाग, हा त्याचाच परिणाम. पाकिस्तानकडून बलुचिस्तानात सूडाच्या कारवाया होऊ नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने अधिक सजग राहण्याची गरज आहे.

Related Articles