वाचक लिहितात   

बीडमधील दहशतीचे वातावरण संपवा
 
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. तशातच बीड येथे आणखी एकाचा दोन दिवस केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यु झाल्याचे कळते. बीडमधील अशाच मारहाणीचे अनेक धक्कादायक व्हिडीओही पुढे येताना दिसत आहेत. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या याचेही मारहाणीचे व्हिडीओ प्रसारित झाले होते. मस्साजोग प्रकरणातील आरोपींना शिक्षा होऊन इतरांना जरब बसण्याची अपेक्षा असताना धुळवड प्रकरणामुळे आणि मारहाणीचे प्रकार थांबलेले नसल्यामुळे बीडमधील दहशतीचे वातावरण कायम असल्याचे वाटते. यात गृहखात्याचे अपयश असल्याचा मतप्रवाह जनमानसात रुजतोय यात वावगे ते काय?
 
दीपक गुंडये, वरळी.
 
तीव्र उष्णतेच्या झळा
 
मार्च महिन्याची सुरुवात होऊन जेमतेम १५ दिवस झाले नाहीत, तोवर राज्याच्या बहुसंख्य भागात अतितीव्र उष्णतेच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात सूर्य अक्षरशः आग ओकत असून कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात उष्णतेची लाट आहे. तपमानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि अकोल्यात उष्णतेने कहर केला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे, अति उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. उच्च तपमानामुळे निर्जलीकरण आणि भूक न लागणे, चक्कर येणे, हातपाय दुखणे, स्नायू दुखणे, थकवा येणे, डोकेदुखी अशा इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढू शकते. अशा परिस्थितीत तब्येतीचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. उन्हाळ्यात आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा, हलके आणि सैल कपडे घालण्याचा, शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर न जाण्याचा आणि सुयोग्य आहाराचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा?
 
मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण मांस विक्रीसंदर्भात ’मल्हार’ प्रमाणपत्र ही नसती उठाठेव सुरू केली. तेे इथेच थांबले नाहीत तर ज्या मांस विक्रेत्यांकडे मल्हार प्रमाणपत्र आहे अशाच मांस विक्री दुकानातून मटण खरेदी करण्याचा फुकटचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ यात्रेत मुसलमानांना दुकाने लावण्यास मनाईचा एकमुखी निर्णय ग्रामसभेने घेतला असता त्यांनी मढी यात्रेत हजेरी लावून ग्रामसभेने घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन ’ऐतिहासिक निर्णय’ अशा शब्दांत केले, तसेच नुकतेच औरंगजेबाची कबर उखडून टाकली पाहिजे असेही विधान केले. हे गृहस्थ आणि त्यांचे पिताश्री पूर्वी काँग्रेस पक्षात होते, तेव्हा त्यांनी अशी धार्मिक भेदाभेद करणारी ना कधी विधाने केली, ना तशी कधी भूमिका घेतलेली दिसली; मात्र भाजपवासी झाल्यापासून त्यांच्यातील कथित हिंदुत्ववादी जागा झालेला दिसतो. हिंदुत्वाचे भोई असल्यासारखे ते मिरवत आहेत. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राकडे गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यानंतर ’हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा’ यादृष्टीने पाहिले जात आहे का आणि म्हणूनच या दिशेला ढकलले जात आहे का अशी शंका उपस्थित होते. हा खेळ धोकादायक आहे.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 
 
बंधने फक्त महिलांवरच का?
 
आज २१व्या शतकात पुरुष आणि महिला असा कोणताच भेद राहिला नाही. आज महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात; मात्र समाजात आजही असा एक घटक आहे ज्यांना महिलांची ही प्रगती खटकत आहे. आजही तो घटक महिलांना केवळ चूल आणि मूल या पुरतेच मर्यादित ठेवू इच्छितो. आजच्या मुली मुलांप्रमाणे कपडे घालतात. यावरुन महिलांना ट्रोल करण्यात समाजातील प्रतिष्ठित घटकही मागे नसतात. महिलांनी कोणते व कसे कपडे घालावेत, महिलांनी कुठे फिरावे, काय खावे, काय प्यावे हे पुरुषांनी ठरवावे ही तर अठराव्या शतकातील मानसिकता झाली. २१व्या शतकातही महिलांना समान अधिकार मिळत नाही. त्यांना त्यांच्या अधिकारासाठी झगडावे लागते, ही दुर्दैवाची बाब आहे. स्त्री-पुरुष समानता ही फक्त बोलण्यापुरतीच आहे का?
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles