खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सुरेश धस धावले   

बीड : ढाकणे पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणार्‍या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबीयांची भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी भेट घेऊन विचारपूस केली! शिरूरमधील ढाकणे पिता-पुत्राच्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. अटकेनंतर गुरूवारी त्याच्या घरावर वनविभागाने  बुलडोझर फिरवला. भोसले याने वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा घर बांधले होते. वन विभागाने धडक कारवाई करत हे घर जमिनदोस्त केले. रविवारी भाजप आमदार सुरेश धस हे भोसले याच्या घरी दाखल झाले. त्याच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. 
 
त्यानंतर बोलताना धस म्हणाले, वनविभागाने नोटीस न देता भोसले याचे घर पाडले आहे. हे कोणत्या नियमाअंतर्गत करण्यात आले, याचा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे. सतीश भोसले याने ढाकणे कुटुंबीयांना मारहाण केली त्याचे समर्थन करणार नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो अटकही आहे. मात्र, त्याचे घर पाडणे चुकीचे आहे. पाडलेल्या घराची पाहणी  करून त्याच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.या भेटीनंतर धस यांना भोसलेच्या कुटुंबीयांची काळजी कशाला?, वनविभागाने बेकायदा घर पाडले, त्यात चुकले काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, घर पाडल्यानंतर भोसले याच्या बहिणीनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. भोसले याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी; पण आमचे घर पाडणार्‍यांवरही सरकारने कारवाई करावी. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी भोसलेच्या बहिणीने केली आहे.

Related Articles