पुरंदर विमानतळासाठी लवकरच भूसंपादन   

पुणे : पुरंदर विमानतळाचा घोळ अखेर संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार विमानतळासाठी सात गावांमधील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. या गावांना औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे. गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या आहेत. जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
 
या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील एकूण २ हजार ८३२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करणे गरजेचे होते. त्यानुसार उद्योग विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले आहे. या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, रस्ते, पाणंद, ओढा या जागाही संपादित केल्या जाणार आहेत. या सर्व सात गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या असून, या जमिनींवर एमआयडीसीचे शेरे मारण्यात येणार आहेत. भूसंपादनाबाबत एमआयडीसी व महसूल विभागाच्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी असेल. त्यानंतर जमिनीची मोजणी होऊन त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
 
पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर २०१६ मध्ये करण्यात आली होती. मात्र त्याला सुरुवातीपासून विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली होती. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या जागी विमानतळ होईल, हे घोषित करून पुढील पाच वर्षांत विमानतळ पूर्ण करण्याचे ठरविले. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, सरकारने आता अधिसूचना जारी केल्याने त्याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे.

Related Articles