महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या   

पुणे : अथक परिश्रम, चिकाटी आणि वेगवेगळ्या आघाडयांवर एकाच वेळी काम करण्याचे कसब ... असे उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. परंतु महिलांना योग्य वेळी संधी न मिळाल्यामुळे अनेक महिला उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहतात. महिलांचे उद्योग क्षेत्रातील प्रमाण वाढण्यासाठी महिलांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत प्रख्यात उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी व्यक्त केले.
 
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे उद्योग क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष-विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, हर्षल लेले, युवा महिला आघाडी सदस्या प्रतिभा संगमनेरकर, स्वाती कुलकर्णी, कार्तिकी जोशी, मंजुषा वैद्य,अंजली दारव्हेकर, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, सचिन पंडित, प्रशांत देशपांडे, अजय कुलकर्णी मंदार महाजन उपस्थित होते.  
 
स्वयंसिद्धा पुरस्कार पुण्यातील गजानन एंटरप्राईजेसच्या संचालिका वैशाली धर्माधिकारी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार आर्टिसन प्रिंट अँड पॅकच्या संचालिका सानिया वाळिंबे यांना प्रदान करण्यात आला. यंदा युवा गौरव पुरस्कार पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांना प्रदान करण्यात आला. युवा उपक्रमांतर्गत कै.सौ. सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै. मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. तर, युवा गौरव पुरस्कार हा युवा कार्यकारिणी पुरस्कृत आहे. सूत्रसंचालन आयुषी भावे यांनी केले व हर्षल लेले यांनी
 आभार मानले. 

Related Articles