बेकायदा गॅसची विक्री करणार्‍यास अटक   

 

पुणे : अवैधरित्या गॅसची विक्री करणार्‍या तरूणाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. एका पत्र्याच्या खोलीमध्ये अवैधरित्या गॅस सिलिंडरची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून, पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपीला अटक केली. विक्रांत राजकुमार जाधव (वय २२, ससाणेनगर, हडपसर) याची चौकशी सुरू केली.
 
हडपसर येथील हांडेवाडी रस्ता परिसरातील माऊली गॅस एजन्सी येथे एका पत्र्याच्या गाळ्यात एक व्यक्ती घरगुती गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत होता. याबाबत माहिती काळेपडळ पोलीसांना खबर्‍याकडून मिळाताच, पोलिसांनी धाड टाकून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी या अवैध व्यवसायावर कारवाई करत आरोपी विक्रांत जाधव याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. घटनास्थळावरून पोलिसांनी ३० मोठ्या व ५० छोट्या अशा ८० गॅस टाक्या, वजन काटा, गॅस हस्तांतर पाईप असा एकूण १ लाख ३० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
 
दरम्यान, विक्रांत जाधव याने ही जागा भाड्याने घेतली आहे. जागा भाड्याने घेताना त्याने घरमालकाला आपण येथे गॅस शेगडी दुरुस्ती करणार आहोत, असे सांगितले होते. जे गॅस कनेक्शन घेऊ शकत नाही असे लोक, विद्यार्थी यांना तो छोट्या गॅसच्या टाक्या देण्याचे काम करतो. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles