जैद टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई   

पुणे : लोणी काळभोर परिसरासह विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, फसवणूक, भरधाव वेगाने वाहने चालवून अपघात करणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुंड भरत तुकाराम जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 
   
टोळी प्रमुख भरत तुकाराम जैद व त्याचे इत्तर सहा ते सात साथीदार यांच्यावर चाकण, आळंदी, भोसरी, एमआयडीसी, निगडी, दिघी, पिंपरी आदी पोलीस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, फसवणूक, भरधाव वेगात वाहने चालवून अपघात करून निष्पाप लोकांचे जीव घेणे, बेकायदा हत्यारे जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण करणे, असे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत थेरूर येथील अक्षय चव्हाण व त्याची पत्नी शीतल चव्हाण यांच्यावर जैद टोळीने लघुशंका करताना हटकले म्हणून मारहाण केली होती. यावेळी चव्हाण यांच्यावर दगडफेक करून गोळीबार केला होता. यात शितल चव्हाण यांच्या डोक्यात दगड लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जैद टोळीवर लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
  
दरम्यान, जैद टोळीचे आजवरचे कारनामे लक्षात घेऊन टोळीप्रमुख भरत जैद व त्याच्या इत्तर सात साथीदारांवर महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत  (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी परिमंडळ ०५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांना सादर केला होता. यानुसार जैद टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्मले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार तेज भोसले, संभाजी देवीकर, प्रशांत नरसाळे, मंगेश नानापुरे, संदीप धूमाळ, महिला पोलीस योगिता भोसुरे यांनी केली आहे.

Related Articles