आरोग्य सेवेच्या बाजारात मोठी उलाढाल   

वृत्तवेध 

कोरोना महामारीपासून, देशात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यामुळे देशात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांचा बाजार सतत विस्तारत आहे.‘झेरोधा’चे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या मते, भारताची प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बाजारपेठ गेल्या चार वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. केवळ वेलनेस आणि फिटनेसचा वाटा ९८ अब्ज डॉलर आणि एकूण बाजार आकाराच्या ५१ टक्के आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला देखील पैसे कमावण्याची मोठी संधी आहे. कारण २०२५ पर्यंत बाजाराचा अंदाजित आकार १९७ अब्ज म्हणजेच सुमारे आठ लाख कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे.
 
कोविड महामारीच्या काळापासून थेट फिटनेस सामग्रीचा वापर १,३०० टक्क्यांनी वाढला आहे. आरोग्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या वाढत्या जाणीवेचा फायदा भारताला होणार आहे. या पोस्टमध्ये, त्यांनी भारतातील वेअरेबल आणि जिममध्ये जाणार्‍यांच्या कमी प्रवेशाची तुलना जगातील इतर राष्ट्रांशी करून फिटनेस उद्योगाच्या संभाव्य वाढीची माहिती दिली आहे. कामथ यांनी म्हटले आहे, की २०२१ च्या आकडेवारीनुसार, भारतात प्रति दहा हजार लोकांमागे फिटनेस वेअरेबलची ११४ युनिट्स विकली जातात, तर जागतिक सरासरी ६४५ आहे. यामुळे, जागतिक आकड्यांच्या तुलनेत भारतात फिटनेस वेअरेबलची विक्री ८२ टक्के कमी आहे. भारतीय लोक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर वार्षिक चार ते दहा हजार रुपये खर्च करतात.
 
प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्ये व्यायाम, निरोगी पोषण, आरोग्य विमा, लवकर निदान आणि आरोग्य ट्रॅकिंग यांचा समावेश होतो. कामथ म्हणाले की, जिम सबस्क्रिप्शनच्या बाबतीत भारत खूप मागे आहे. त्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत ०.२ टक्के आहे. याव्यतिरिक्त ५० टक्क्यांहून अधिक जिम सदस्य नियमितपणे जिममध्ये जात नाहीत. भारतात सुमारे ९६,२७८ जिम आहेत.

Related Articles