भाच्यावर कारवाई, की धूळफेक   

राज्यरंग :  शिवशरण यादव

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाचा आकाश आनंद यास पक्ष संघटनेतून काढून इतरांना इशारा दिला आहे. पक्षात गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा या इशार्‍याचा वरवरचा अर्थ आहे; परंतु, मायावती यांची कारवाई गंभीर आहे की उत्तर प्रदेशातील राजकारणात काशीराम यांच्या वारशाला दिलेल्या आव्हानावर मात करण्यासाठी आहे, हे येणारा काळच ठरवेल.
 
गेले काही दिवस  उत्तर  प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा  मायावती आपल्या पक्षाच्या ‘स्वच्छते’बाबत चर्चेत आहेत; पण बसपच्या हितचिंतकांना अपेक्षित असलेला बदल दिसत नाही. त्यांचा उत्तराधिकारी मानला जाणारा भाचा आकाश आनंद याची त्यांनी पक्षातून हकालपट्टी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो त्यांच्या क्षमतेपेक्षा मोठा होत होता की त्याची क्षमता कमी होती याबाबत वेगवेगळी मते आहेत. मायावतींच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी बसपच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला हे सत्य आहे. पराभवानंतर त्यांनी केवळ राजकीय विरोधकांनाच नव्हे, तर जाट, मतदान्न यंत्रे आणि मुस्लिमांनाही दोष दिला. ‘आमची माणसे’ निघून जात आहेत. बहुतेक लोक भारतीय जनता पक्षाकडे  गेले आहेत,’ असे त्या म्हणतात. त्यांनी अलिकडेच बसपचा तरुण चेहरा आकाश आनंद यांची पक्षातून हकालपट्टी केली, तेव्हा बहुजन चळवळीशी निगडित लोकांना आश्चर्य वाटले नाही, ते त्यामुळेच. 
 
गेल्या काही वर्षांमध्ये संघटनेशी निगडित बडे चेहरेही बसप सोडून इतर पक्षांमध्ये गेले. पक्षात मायावती हा एकमेव दखलपात्र चेहरा आहे. आकाश आनंद आता पक्षाचा चेहरा राहिलेला नाही.  यापूर्वीही मायावती यांनी भाचा आकाश यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र त्यानंतर त्यांना पक्षात पुन्हा महत्त्वाची पदे दिली गेली. आता ही तशीच चाल आहे की काय, अशी शंका घेतली जात आहे.
 
उत्तर प्रदेशच्या राजकारणात काशीराम यांच्या वारशाबद्दल चर्चा सुरू झाली आणि मायावती त्या पदी राहिल्यामुळे आकाश आनंद यांना बलिदान द्यावे लागले. नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद हेही  काशीराम यांच्या राजकारणाचे खरे वारसदार आपण असल्याचा दावा करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी मायावती यांच्यावर बहुजन मिशनपासून चळवळ विचलित केल्याचा ठपका ठेवला आहे. आझाद यांनी नगीनामधून निवडणूक जिंकल्यानंतरच मायावतींनी आकाश आनंद यांना पद आणि जबाबदारी परत केली; पण पोटनिवडणूक आणि दिल्ली निवडणुकीत बसपला काहीही मिळाले नाही. अशा स्थितीत चंद्रशेखर वेगाने प्रगती करत आहेत आणि आकाश आनंद योग्य प्रकारे सामना करू शकत नाहीत, असे मायावतींना वाटले असू शकते. 
 
आकाश आनंद यांचे हातही बांधलेले होते. त्यांना मुक्तपणे कारभार करण्याची संधी फार कमी मिळाली. काशीराम यांच्या वारशावरून चंद्रशेखर आणि आकाश आनंद यांच्यात तुलना झाली असती, तर बसप कमकुवत होण्याचा धोका होता; पण आता चंद्रशेखर यांची तुलना मायावतींसोबत केली जाईल, त्यात ते कुठेही उभे राहू शकणार नाहीत. तोपर्यंत आकाश आनंद यांना बाहेर करण्यात आले असावे. आकाश आनंद यांच्यावर मायावती यांनी केलेली कारवाईही तात्पुरती आहे, असे वाटते. मागील वेळेप्रमाणेच त्याला भविष्यातही संधी मिळू शकते. ज्याप्रमाणे मायावतींनी पोटनिवडणुकीचे निकाल पाहता आकाश आनंद यांना सर्व अधिकार परत केले होते, तेच त्या पुन्हा करू शकतात. त्यांनी आपला भाऊ आनंद कुमारसोबतही असेच केले. त्यांनाही काढून टाकले, परत घेतले आणि पुन्हा काढले. 
 
आकाश आनंद यांच्यावरील कारवाईला जबाबदार धरण्यात आलेले त्यांचे भाषण पक्षविरोधी कृती नाही. त्यांनी पक्षातील गटबाजीकडे बोट दाखवले. हेच संकट काँग्रेस आणि इतर पक्ष सतत झेलत आहेत. आकाश आनंद आपण असहाय असल्याचे सांगत आहेत. मायावतींनी न्यायावर प्रेम करणार्‍या आणि सर्वांना समान वागणूक देणार्‍या नेत्या अशी प्रतिमा ठसवण्यासाठी हे केले असावे, जेणेकरून वरिष्ठ नेत्यांनाही योग्य संदेश जाईल. सर्व जुने सहकारी मायावतींना सोडून गेले आहेत; पण आकाश आनंद यांच्या समर्थकांनी आशा सोडलेली नाही. ‘सोशल मीडिया’वर त्याच्या समर्थकांच्या पोस्ट आणि कॉमेंट्स हेच सांगत आहेत. 
असे असले तरी बहुजन समाज पक्षात सुरू झालेला कौटुंबिक वाद आता वाढत चालला आहे. भाचा आकाश आनंद याच्याशी झालेल्या मतभेदानंतर भाऊ आनंद कुमार यांच्यासोबतही मायावतींचे फारसे जमत नाही. त्यांनी अलिकडेच भाचा आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. यानंतर  आनंद कुमार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली; मात्र आनंद कुमार यांनी राष्ट्रीय समन्वयक पदावर काम करण्यास नकार दिला. यानंतर मायावतींनी त्यांच्याकडून जबाबदारी काढून घेतली. याशिवाय मायावतींनी पक्षात अनेक फेरबदल केले आहेत. सहारनपूरचे रहिवासी रणधीर बेनिवाल यांच्याकडे राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  
 
मायावती यांनी आकाश आनंद यांना दहा डिसेंबर २०२३ रोजी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. आता त्याच मायावती आपल्या हयातीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात कोणीही वारसदार असणार नाही, असे सांगतात.  आपल्यासाठी पक्ष आणि चळवळ प्रथम तर कुटुंब आणि नातेसंबंध दुसर्‍या क्रमांकावर असून जिवंत असेपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाला पुढे नेत राहीन, असे सांगत मायावती यांनी चंद्रशेखर आझाद यांना काशीराम यांच्या वारशावरून आकाश आनंदशी नव्हे, तर आपल्याशी संघर्ष करावा लागेल, असा संदेश दिला आहे.
 
२०२२ च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीमध्ये आकाश आनंद यांचे नाव पहिल्यांदाच स्टार प्रचारकांच्या यादीत दिसले. त्यांनी लंडनमधून ‘मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) चे शिक्षण घेतले आहे. अशोक सिद्धार्थ हे त्यांचे सासरे. मायावती यांनी २० दिवसांपूर्वी गटबाजीचा आरोप करून अशोक सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली. संघटनेतील गटबाजी आणि शिस्तहीनतेवरून ही कारवाई करण्यात आली. डॉ. अशोक सिद्धार्थ आणि नितीन सिंग इशारे देऊनही पक्षात दुफळी निर्माण करत होते. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, असे मायावती यांनी म्हटले होते.
 
एके काळी उत्तर प्रदेशासारख्या राज्यावर सत्ता गाजवलेल्या आणि पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणार्‍या मायावती यांनी धरसोड वृत्ती आणि हुकूमशाही नेतृत्वामुळे चांगले सहकारी गमावले. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अवघा एक आमदार असलेल्या मायावतींनी पक्ष रसातळाला नेला आहे. अगोदर कौटुंबिक सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आणि नंतर त्यावरून वाद पोसले आहेत. पक्षाला दिशा देऊ शकणारे आपल्या नेतृत्वाला आव्हान देतील, या भयगंडाने मायावती पछाडल्या आहेत. त्यातून त्यांनी आता घेतलेले निर्णय पक्षात अस्वस्थता निर्माण करणारे आहेत. 
 
सध्या बसपमध्ये जे काही चालले आहे, ते पाहता हे संपूर्ण प्रकरण आकाश आनंद यांच्याभोवती फिरत आहे असे दिसते; परंतु दिसते तसे नसते. मायावती यांनी अनेकांना अजमावले; पण त्यांना हवी ती ठिणगी फक्त आकाश आनंदमध्येच सापडली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आकाश आनंद यांच्याकडून सर्व जबाबदार्‍या काढून घेण्यात आल्या, तेव्हा मायावती यांनी त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्था केली होती. आकाश आनंद यांच्यावरील ताजी कारवाईही बसपच्या राजकारणाची कायमस्वरूपी अभिव्यक्ती नाही; मात्र तिने राज्यात बरेच राजकीय तरंग उमटवले आहेत.     

Related Articles