‘कर विहार सामर्थ्याने’!   

चर्चेतील चेहरे : राहुल गोखले 

आसाममधील वन्यजीवशास्त्रज्ञ, पर्यावरण कार्यकर्त्या आणि उद्योजिका पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश २०२५ मधील प्रभावशाली महिलांच्या सूचीमध्ये करून ‘टाइम’ मासिकाने गेली दोन दशके त्या करीत असलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या आणि संवर्धनाच्या कार्याचा योग्य गौरव केला आहे. बर्मन यांचा असा गौरव होण्याचा हा पहिलाच प्रसंग नव्हे. २०१७ मध्ये केंद्र सरकारने त्यांचा सन्मान ‘नारी रत्न’ पारितोषिताने केला होता तर २०२४ मध्ये ‘ग्रीन ऑस्कर’ मानल्या जाणार्‍या ‘व्हिटले गोल्ड’ पारितोषिकाने त्यांना गौरविण्यात आले होते. ‘टाइम’ मासिकाने त्यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहेच.
 
पूर्णिमा देवी बर्मन यांना आपले जीवनध्येय अपघातानेच सापडले असे म्हटले पाहिजे; पण एकदा ते निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यासाठी स्वतःस झोकून दिले. आसाममधील कामरूप जिल्ह्यात जन्मलेल्या पूर्णिमा देवी यांचे लहानपण  ब्रह्मपुत्रा नदीच्या सान्निध्यात गेले. त्यांची आजी त्यांना पशुपक्षांच्या आणि जैववैविध्याच्या गोष्टी सांगत असे. त्या गोष्टींनी पूर्णिमा देवी इतक्या प्रभावित झाल्या की तो त्यांचा केवळ रुचीचा नव्हे तर अभ्यासाचाही विषय झाला. गुवाहाटी विद्यापीठातून त्यांनी जीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेच; पण पुढे डॉक्टरेटसाठी त्यांनी संशोधनास देखील सुरुवात केली होती. मात्र त्याच सुमारास घडलेल्या एका घटनेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 
आसाममधील अनेक भागांत ग्रेटर अडज्युटन्ट स्टोर्क नावाचा पक्षी आढळतो. तो पक्षी दिसायला काहीसा करकोच्यासारखा असला तरी देखणा नसतो. किंबहुना अगदीच बेढब असतो. मात्र निसर्गातील ’घाण’ साफ करण्याचे कार्य निसर्गाने त्या पक्ष्याकडे सोपविले आहे. एका अर्थाने गिधाडांप्रमाणेच. मात्र या पक्ष्यांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे  वनांमधील झाडांवर हे पक्षी घरटी करीत नाहीत तर मानवी वस्तींजवळील झाडांवर करतात. दिसायला बेढब, घाणीवर जगणारा हा पक्षी. त्यामुळे हा पक्षी अपशकुनी आहे अशा स्वरूपाची तेथे अंधश्रद्धा; शिवाय त्यांची विष्ठा इत्यादींमधून परिसर घाण होतो त्यामुळे काहीसा तिटकारही. मात्र या पक्ष्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याची जाणीव पूर्णिमा देवी यांना एका प्रसंगातून झाली.
 
या पक्ष्यांचे सान्निध्यच नको म्हणून नागरिक त्या पक्ष्याची घरटी असलेली झाडे पाडून टाकत असत. असेच एका ग्रामस्थाने एक झाड पाडले; तेंव्हा त्या झाडावर या  पक्ष्यांची नऊ घरटी आणि नऊ पिल्ले होती. तो प्रसंग २००७ चा. झाड जमीनदोस्त झाले ,ती घरटी उद्ध्वस्त झाली आणि पिल्ले जमिनीवर कोसळली. त्यांतील काही पिल्ले मृत्युमुखी पडली पण काहींमध्ये धुगधुगी होती. पूर्णिमा देवी यांनी ते दृश्य पाहिले आणि दोन जुळ्या मुलांची आई असलेल्या पूर्णिमा देवी यांच्यातील मातृहृदय हेलावले. त्यांनी त्या ग्रामस्थाला जाब विचारला. त्यांच्यात वादावादी सुरु झाली तेंव्हा आणखी काही ग्रामस्थ तेथे जमा झाले आणि वाद वाढत गेला. एवढेच नव्हे तर या पक्ष्याचे मांस खाण्यासाठी पूर्णिमा देवी तेथे आल्या होत्या का इत्यादी शेलकी शेरेबाजी ग्रामस्थांनी केली. तेंव्हाच पूर्णिमा देवी यांनी ठरविले की या पक्ष्याबद्दल जागृती निर्माण करायची तर केवळ प्रयोगशाळेत किंवा वर्गात अभ्यास-संशोधन करून भागणार नाही. जमिनीवर उतरूनच ते करावे लागेल. या पक्ष्याला आसाममध्ये ’हरगीला’ म्हटले जाते. हाड गिळणारा पक्षी असा त्याचाअर्थ. तो पुरेसा बोलका. पूर्णिमा देवी समाज जागृतीसाठी सज्ज झाल्या. पीएचडी मागे राहिले.
 
तथापि यात अडथळे अनेक होते. सर्वांत मोठा अडथळा हा समाजातील पुरुषांच्या मानसिकतेचा होता. दादरा जिह्ल्यात पूर्णिमा देवी यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या या प्रयोगाची सुरुवात केली; तेंव्हा तेथील पुरुषांनी खोडा घातला. त्यांनी पूर्णिमा देवी यांना अवमानास्पद वागणूक दिली; त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. पण एकदा निर्धार केल्यांनतर पूर्णिमा देवी यांनी माघार घेतली नाही; त्यांचा कल उपाय शोधण्याकडे होता. सुरुवातीला महिलांकडून देखील प्रतिसाद लाभला नाही. घरातल्या कामांमधून आपल्याला उसंतच मिळत नाही इत्यादी सबबी त्या देत असत. तेंव्हा पूर्णिमा देवी यांनी शक्कल लढवून पाककृती स्पर्धा आयोजित केल्या. त्यांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद लाभला. मात्र त्याचा उपयोग पूर्णिमा देवी हरगीला पक्ष्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी करायला लागल्या. त्यांची ती कळकळ हळूहळू फलद्रुप होऊ लागली. महिलांपर्यंत त्या हरगीला पक्ष्याचे निसर्गातील स्थान, एकूणच निसर्गसाखळीत प्रत्येक जीवाचे असणारे महत्व; पर्यावरण संरक्षण हे मुद्दे पोचायला लागले. 
 
एकदा पूर्णिमा देवी आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी  महिलांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्याच वेळी त्याच भागात एक राजकीय कार्यक्रम होणार होता. मात्र या दोन कार्यक्रम स्थळांच्या माहितीविषयी झालेल्या गोंधळामुळे पूर्णिमा देवी यांच्या  बैठकीला तीसऐवजी सहाशे महिला उपस्थित झाल्या. ते पाहून पूर्णिमा देवी हबकल्या. एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर कसे बोलायचे हा प्रश्न त्यांना पडला. पण शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी कोणताही बदल घडविण्यात महिलांची भूमिका कशी अनन्यसाधारण महत्वाची असते याचे प्रतिपादन केले. तेथेच ‘हरगीला फॅमिली’ या चळवळीची सुरुवात झाली त्याचेच रूपांतर पुढे ‘हरगीला आर्मी’मध्ये झाले.
 
 हरगीला पक्ष्यांच्या वसतिस्थानांचे संरक्षण करणे, जखमी पिल्लांची काळजी घेऊन त्यांना वाढविणे आणि मग निसर्गात सोडून देणे, या पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी व्यवस्था व्हावी म्हणून वृक्षारोपण करणे असे अनेक उपक्रम ही ’सेना’ हाती घेऊ लागली. पीएचडीला रामराम ठोकून पूर्णिमा देवी यांनी स्वतःस या कार्यात झोकून दिले होते; मात्र काहींनी त्यांना परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला. त्यांचे हे काम निरुपयोगी आहे इत्यादी कारणे सांगत त्यांनी पुन्हा पीएचडी सुरु करावे इत्यादी सल्ले दिले. पण पूर्णिमा देवी विचलित झाल्या नाहीत. महिलांचा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक होता. आजमितीस त्या चळवळीशी सुमारे बारा हजार महिला जोडलेल्या आहेत. 
 
त्या चळवळीची फलनिष्पत्ती ही की ज्या तीन जिल्ह्यांत या पक्ष्यांची संख्या सोळा वर्षांपूर्वी केवळ सत्तावीस इतकीच उरली होती; ती आता  २५२ पर्यंत पोचली ; शिवाय पूर्ण आसाममध्ये या पक्ष्यांची संख्या १८०० वर पोचली आहे. आता पूर्णिमा देवी यांनी हरगीला वाचविण्याची मोहीम बिहारच्या भागलपूरमध्ये देखील सुरु केली आहे. एवढेच नव्हे तर कंबोडियामध्ये देखील त्यांनी हे कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय अंदाजाप्रमाणे आज जगभरात या पक्ष्यांची संख्या जवळपास तीन हजार आहे. दोन दशकांपूर्वी ज्या प्रजातीला लुप्तप्राय घोषित करण्यात आले होते; त्याच प्रजातीला आता नामशेष होणार्‍या प्रजातींमध्ये जागा मिळाली आहे. या चढत्या भाजणीचे श्रेय केवळ पूर्णिमा देवी यांचे.
 
या पक्ष्याबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. जॅकेटपासून उश्यांच्या अभ्र्यांपर्यंत अनेक वस्तूंवर हरगीला पक्ष्याची प्रतिमा अवतरली. आणि हे सगळे हरगीला आर्मीच्या महिलांनी केले. करोनाच्या साथीच्या काळात मास्क लावण्याची जागृती करण्यासाठी या महिलांनी हरगीला पक्षाची प्रतिमा असणारे मुखवटे तयार केले आणि अशा अकरा हजार मुख्यवट्यांचे वितरण नागरिकांमध्ये केले. या सर्व वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी एका संस्थेची मदत त्यांनी घेतली आणि आता हरगीला पक्ष्याची प्रतिमा असणार्‍या या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. याच सुमारास आसाममध्ये पहिल्या हरगीला शिक्षण आणि संरक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. पूर्णिमा देवी यांच्या या निरलस मेहनतीचा एक दृश्य परिणाम म्हणजे हरगीला पक्ष्याविषयीचे गैरसमज दूर झाले; त्यांची संख्या वधारली; पर्यावरणाचे संवर्धन झाले. मात्र त्याचा दुसरा तितकाच महत्वाचा परिणाम असा की या चळवळीशी निगडित महिलांच्या हातात पैसा खेळू लागला. त्यापैकी बहुतांशी महिलांचे पती हे मजूर. तेंव्हा पैशाची नेहेमीच चणचण. पण महिला कमावू लागल्याने कुटुंबाला हातभार लाभला.
 
एका ध्येयाने झपाटून पूर्णिमा देवी गेली जवळपास दोन दशके कार्यरत आहेत. हरगीला पक्ष्याच्या एका जखमी पिल्लाने त्यांच्यात कणव निर्माण केली. पण त्यातूनच काही भरीव करण्याची प्रेरणाही जागृत केली. त्यातूनच हे काम उभे राहिले आहे. पर्यावरणाशी निगडित अनेक संस्थांशी पूर्णिमा देवी यांचा संपर्क आणि संबंध आहे. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. हरगीला पक्ष्यांचे अस्तित्वच धोक्यात आले होते; त्यांस पूर्णिमा देवी यांनी पंख दिलेच; पण त्या चळवळीसाठी त्यांनी महिलांना प्रेरित केले आणि त्याच ओघात त्यांनाही सबलीकरणाचे पंख दिले’ एका अर्थाने हरगीला पक्षी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी झटणार्‍या महिलांनाही पूर्णिमा देवी बर्मन यांनी ’कर विहार सामर्थ्याने’चा आत्मविश्वास दिला असेच म्हटले पाहिजे.     
 

Related Articles