विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू   

कराडजवळील करवडीतील घटना

सातारा : कराडजवळील करवडी येथे विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र दादा कोळेकर-मोरे (वय-५५) आणि राजवर्धन किशोर पाटील (वय-२२) अशी मृतांची नावे आहेत. राजवर्धन हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तर, मोरे हे शेतमजूर होते. 
 
करवडीतील भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेतजमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली पाण्याची मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर हे दोघे दुपारच्या प्रहरी गेले होते. मोटार बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकरला पोहण्याची इच्छा झाली.
 
याबाबत राजवर्धनने भ्रमणध्वनीवरून वडिलांना तशी कल्पना दिली. यावर दुपारची वेळ असल्याने विहिरीत उतरू नका, असे किशोर पाटील यांनी सुनावले. दरम्यान, पंधरा त वीस मिनिटांतच पाटील यांनी राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र, तो  उचलला गेला नाही, त्यामुळे किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. विहिरीशेजारी या दोघांचे कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना तातडीने बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज नसल्यामुळे आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही.शेवटी कराडमधील मासेमारी करणार्‍या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि कोळेकर यांचे मृतदेह बाहेर काढले. 
 

Related Articles