पीएमपी बसमध्ये लवकरच ’पुढील थांबा उद्घोषणा’ स्वयंचलीत प्रणाली   

ज्येष्ठ, अपंग, दृष्टिहीन प्रवाशांना होणार फायदा 

पुणे : प्रवाशांना नियोजित ठिकाणी उतरण्यापूर्वीच माहिती मिळावी, याकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रत्येक बसमध्ये ‘पुढील थांबा उद्घोषणा’ही स्वयंचलीत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ, अपंग, दृष्टीहीन, महिला प्रवाशांना या सुविधेचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यानुसार पीएमपीच्या चार हजारांहून अधिक थांब्यांचे उद्घोषणा करणारे ध्वनीमुद्रणाचे काम अंतिम टप्प्यापर्यत आले आहे. या यंत्रणेची लवकरच चाचणी होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
 
सार्वजनिक वाहतूक सेवेत मेट्रो, रेल्वे, आणि विमान प्रवाशांसाठी स्वयंचलित घोषणांची सुविधा उपलब्ध हे, मात्र अद्याप पीएमपीमध्ये या सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अनेकदा दृष्टिहीन, अपंग आणि वृद्ध प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होणे, नियोजित थांबा ओळखण्यात अडचणी निर्माण होणे, ज्यामुळे थांबे चुकणे, असे प्रकार होत आहे. प्रवाशांची गैरसोय होत असून विशेषत: बाहेरील प्रवाशांना शहराची ओळख नसल्याने त्यांना नियोजित ठिकाणी जाताना सहप्रवाशांवर अवलंबून रहावे लागत आहे. या नवीन प्रणालीमुळे, त्यांच्या दैनंदिन प्रवासात अधिक स्वातंत्र्य मिळेल. याव्यतिरिक्त, वृद्ध प्रवाशांना ज्यांना बस मार्ग निर्देशक वाचण्यात किंवा अपरिचित थांबे ओळखण्यात अडचण येत असेल त्यांना देखील या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.
 
अनेकदा चालक आणि प्रवाशांमध्ये तसेच सहप्रवाशांसोबत वादविवाद असे प्रकार रोखण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांची चिंता दूर करून सुलभ प्रवासाच्या अनुषंगाने पीएमपीमध्ये सुधारणा करण्यासाठी या सुविधेचा अवलंब करण्यात येत असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक वाहतूक सेवेतील जीवनवाहिनी ठरलेल्या पीएमपीचा पुणे, पिंपरी चिंचवड ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीपर्यंतच्या ४७२ मार्गांवरून दैनंदीन प्रवास सुरु आहे. त्यासाठी चार हजार ३०० पेक्षा अधिक बस थांबे असून या स्थानकांची नावे या प्रणालीत संकलीत करण्यात येणार आहे. दैनंदीन मार्गावरून ज्या बस धावतात, त्याबसमध्येच ही सुविधा लावल्याने बसचे वेळापत्रक आणि नियोजनात सुसूत्रता आणण्याबाबत नियोजन आहे.

प्रणालीची कालबध्दता सुनिश्चित 

पीएमपीच्या बसला जीपीएस सुविधा बसविण्यात आली आहे. संबंधित बस कोणत्या मार्गावरून धावत आहे, याची मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती प्राप्त करता येते. याच जीपीएस प्रणालीमध्ये नवीन ‘स्वयंचलीत थांबा उद्घोषणा प्रणाली’ जोडण्यात आली आहे. उद्घोषणा प्रणालीमध्येही साडेचार हजारांहून अधिक थांब्यांंचे ध्वनीमुद्रण एकाच आवाजात करण्यात आले आहे. दोन्ही प्रणाली स्वयंचलीत असल्याने वाहकाला पुढचा थांबा कोणता आहे, हे सांगण्याची गरज भासणार नाही. तसेच, आधुनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येईल. ज्या ठिकाणावरून बस मार्गस्थ होईल, त्या मार्गावरील पहिला थांबा येण्यापूर्वीच थांब्याची उद्घोषणा होईल. त्यानुसार कालबद्धताही सुनिश्चित करण्यात आली आहे.
 
प्रवाशांना नियोजित ठिकाणी उतरण्यापूर्वी अगोदरच कल्पना यावी, या दृष्टीने ‘पुढील थांबा उद्घोषणा’ ही स्वयंचलीत प्रणाली पीएमपीच्या सर्व बसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यापासून ही सुविधा सुरू करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. 

- नितीन नार्वेकर,सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

 

Related Articles