झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी   

१७ जणांवर गुन्हा, पाच जणांना अटक 

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत झोपडपट्टी पुर्नविकासाच्या (एसआरए) झालेल्या वादातून दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यावेळी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील पाच जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दोन्ही गटाकडून परस्परांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. 
 
योगेश भोसले (रा. पिंपळे गुरव), मनोज ठोसर, गफूर शेख (रा. औंध) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असूने साथीदार राजू निरवणे, किरण निरवणे, बाबा शेख, जुबेर शेख, राम कांबळे (रा. पुणे), लक्ष्मण (रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल शाम चव्हाण (वय २८, रा. औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वसाहतीमध्ये एकूण ४१२ झोपड्या आहेत. त्यांचे पुर्नविकास होणार आहे. गेल्या १० वर्षांपूर्वी वसाहतीमधील नागरिकांकडून बळजबरीने अर्ज भरुन घेण्यात आले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने कोणालाही लेखी स्वरूपात अर्ज दिले नाही. त्यामुळे  किती स्क्वेअर फुटांमध्ये आपणाला घरे मिळतील, याविषयी नागरिकांना काहीच माहित नव्हते. याला वसाहतीमधील ९५ टक्के नागरिकांचा विरोध आहे. योगेश भोसले व इतरांनी बाहेरुन मुलांना बोलावून घेऊन अतुल शाम चव्हाण, त्यांचे मामा व आजी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील लोखंडी शस्त्र दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या प्रकरणात योगेश किशोर भोसले (वय ३८, रा. औंध) यांनीही चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतुल चव्हाण आणि आमोल कांबळे (रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) यांना अटक केली आहे. 

Related Articles